केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्ममंत्री अजित पवार  (Pudhari Photo)
पुणे

MOA Election | महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणूक : अजित पवारांना नव्हे, कारभाराला विरोध : मुरलीधर मोहोळ

Murlidhar Mohol on Ajit Pawar | आम्ही केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने आम्हाला असोसिएशन निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Olympic Association Election

पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांना आमचा विरोध नाही. मात्र, संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांच्या कार्यशैलीला आमचा विरोध आहे. जशी माझ्या संघटनेची शिरगावकर यांच्याविरोधात तक्रार आहे, तशा इतरही अनेक संघटनांच्या तक्रारी आहेत. आम्ही केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आम्हाला असोसिएशन निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले असल्याची भूमिका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्‍त केली.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. यासाठी २ नोव्हेंबररोजी मतदान होणार आहे. ॲथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी, ज्युडो, खो-खो, टेनिस, रायफल, रोईंग यांसारख्या २२ संघटनांचे प्रतिनिधी मतदानात सहभागी होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सचिवांचा मनमानी कारभार सुरू होता. आमच्या संघटनेला मान्यता दिली जात नव्हती, इतर संघटनांच्याही सचिवांच्या संदर्भात तक्रारी होत्या. यामध्ये अजित पवार यांनी लक्ष घालावे, एवढीच आमची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीचा राजकारणाशी कसलाही संबंध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत लक्ष घातलेले नसल्याचेही मोहोळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

पदाधिकाऱ्यांना क्रीडा मंत्र्यांचे धमकीचे फोन

राज्याचे क्रीडा मंत्री आम्हाला पाठिंबा दिलेल्या क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून धमकवतात, असा आरोप महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत वरिष्ठ उपाध्यक्ष पदाचे उमेदवार आमदार संदीप जोशी यांनी केला. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या क्रीडा मंत्र्यांना आमचा विरोध आहे, असेही जोशी म्हणाले.

असा आहे जाहिरनामा

- संघटनांच्या चेंज रिपोर्टच्या त्रुटींवर भर

- राज्य अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करणे

- खेळाडूंच्या प्रशिक्षणाची विशिष्ट योजना तयार करणे

- बालेवाडीतील स्‍टेडियमच्या भाडे शुल्‍कात सवलत देणे

- खेळाडूंसाठी वसतिगृहाची निर्मिती करणे

- मिशन लक्षवेध योजनेत मातीतील खेळांना प्राधान्य

- संघटनांचे वार्षिक शुल्‍क कमी करणे

- 'क्रीडा संघटक' पुरस्कार पुन्हा सुरु करणार

- २०२८ मध्ये महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT