Ashish Sable CM Letter for State Men Commission
पुणे: राज्यात पुरुषांचा छळ, खोट्या केसेस दाखल करणे, यासारखे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे पुरुषांना दाद मागण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी राज्यात राज्य पुरुष आयोग स्थापन करा, अशी मागणी मनसे नेते आशिष साबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पुढील ४ ते ५ दिवसांत याबाबत मनसेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे साबळे यांनी सांगितले. देशभरात पुरुषांचा छळ आणि मानसिक अत्याचार याचे प्रमाण ५१.५ टक्के असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.
सध्या पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावरून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हा विषय अत्यंत नाजूक व संवेदनशील असून त्या संपूर्ण क्रूरकर्मा कुटुंबावर जन्मठेप हीच शिक्षा देऊन न्याय द्यावा. परंतु, राज्यात अशा प्रकारच्या अनेक घटना घडत असून त्यात पुरुषांचाही मानसिक छळ, खोट्या केसेस दाखल करणे, तसेच घटस्फोट घेताना लाखोंची, करोडोची, पोटगी मागणी हे प्रकार सुरू आहेत. नाहक बदनामी करणे. या प्रकारामुळे पुरुषांना विनाकारण मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे या प्रकरणात योग्य दाद मागण्यासाठी व्यासपीठ असावे, म्हणून 'पुरुष आयोग' स्थापन करावा,अशी मागणी आम्ही करत आहे.
भारतात एकूण पुरुष हिंसाचार व मानसिक छळ याचे एकंदर प्रमाण हे ५१. ५१७ टक्के असून पुरुषांना ना पोलीस, ना कोर्ट, कोठेही न्याय मिळत नाही. कारण जवळपास सर्व कायदे हे महिलांच्या बाजूने आहेत. याचा तत्काळ विचार करावा, व या मागणीकडे सकारात्मक पणे पाहून अंमलबजावणी करावी, असे साबळे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.