Pune News: जिल्ह्यातील 21 पैकी 18 जागा जिंकत महायुतीने वर्चस्व मिळविले. त्यामुळे आता मंत्रिपदासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांतील आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी मोठी चुरस निर्माण होणार आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्यासह दिलीप वळसे पाटील यांची मंत्रिपदे निश्चित मानली जात आहेत. याव्यतिरिक्त अजून कोणाला संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.
पुणे शहरात भाजपच्या कोट्यातून सलग चौथ्यांदा विजयी झालेल्या पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांना मंत्रिपदासाठी मोठी संधी मानली जात आहे. महिला आमदार म्हणून त्यांना संधी मिळू शकते. अनुसूचित जातीमधून पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.
याशिवाय जिल्हातून भाजप दौंडचे एकमेव विजयी आमदार राहुल कुल सलग तीन वेळा विजयी झाले आहेत, त्यामुळे मंत्रिपदासाठी त्यांचेही नाव स्पर्धेत येऊ शकते. पिंपरी-चिंचवडमधून महापालिका क्षेत्रातून सलग तिसर्यांदा विजयी झालेले भोसरीचे आमदार महेश लांडगे हेही मंत्रिपदासाठी दावेदार मानले जात आहेत.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना ओबीसी कोट्यातून संधी मिळू शकते, तर शिवसेनेचे एकमेव विजयी आमदार विजय शिवतारे यांनाही शिवसेनेच्या कोट्यातून पुन्हा मंत्रिपदाची जबाबदारी मिळू शकते. मात्र, मंत्रिपदाच्या दावेदारांची संख्या मोठी असल्याने सर्व समीकरणे पाहूनच कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घायालयची यासंबंधीचा निर्णय होणार, हे स्पष्ट आहे.