कात्रज / कोंढवा: राज्याच्या विविध जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसाने बळीराजा ओल्या दुष्काळाच्या छायेत दडपला आहे. बळीराजाच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे.
सामाजिक बांधिलकीतून विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी शहराचे शहरपण टाकून गावचे गावपण जपण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सात लाख ऐंशी हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. (Latest Pune News)
हडपसर विधानसभा मतदारसंघात राज्याच्या विविध भागातून स्थलांतरित मजूर, कामगार वास्तव्यास आहेत. या भागात फिरत असताना स्वकीयांचे ओल्या दुष्काळाचे भीषण स्वरूप नागरिकांच्या डोळ्यांत दिसत होते. त्यामुळे तत्काळ मदतीचा निर्णय घेतला, असे टिळेकर यांनी सांगितले.
मुसळधार पावसाने विविध जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आधार व मदत देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीचे सरकार खंबीरपणे उभे आहे. तसेच, पुणे शहर व राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्था व व्यक्तींनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत आर्थिक मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.