प्रसाद जगताप
पुणे: पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने आपला मोर्चा मिरज ते कोल्हापूर या मार्गाकडे वळवला आहे. मिरज-कोल्हापूर दरम्यानच्या 47 ते 50 किलोमीटर अंतराच्या दुहेरीकरणाचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले असून, याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पूर्ण झाला आहे. हा प्रस्ताव लवकरच अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविला जाणार आहे.
पुणे-मिरज दरम्यानचे 237 किलोमीटर अंतराचे दुहेरीकरण नुकतेच पूर्ण झाल्यामुळे या भागातील रेल्वे वाहतुकीला आधीच गती मिळाली आहे. मात्र, मिरज ते कोल्हापूर हा टप्पा अद्याप एकेरी मार्गाचा असल्यामुळे कोल्हापूरहून सुटणाऱ्या आणि मिरजला येणाऱ्या गाड्यांना मिरज स्टेशनवर किंवा इतर ठिकाणी थांबावे लागत होते.
यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात होता. हीच अडचण दूर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे मुख्यालयाकडून मिरज-कोल्हापूर दुहेरीकरणाचे नियोजन सुरू करण्यात आले. या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या ‘लिडर सर्व्हे’चे कामही आता पूर्ण झाले आहे.
हा दुहेरीमार्ग पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरहून पुणे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस आणि मालगाड्यांचा वेग लक्षणीयरीत्या वाढणार आहे. परिणामी, प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचणार असून, पश्चिम महाराष्ट्रातील व्यापार आणि दळणवळणाला मोठी गती मिळणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे
पुणे-मिरज दुहेरीकरण अंतर - 237 किमी. (काम पूर्ण)
मिरज-कोल्हापूर अंतर - 50 किमी (दुहेरीकरण प्रस्तावित)
सध्याची स्थिती-लिडर सर्व्हेचे काम पूर्ण, ‘डीपीआर’ मंजुरीसाठी पाठवणार
गाड्यांचा वेग वाढणार, क्रॉसिंगसाठी होणारी दिरंगाई टळणार. प्रवाशांना फायदा होणार
पुणे-मिरज दुहेरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, आता मिरज ते कोल्हापूर या महत्त्वपूर्ण मार्गाचे दुहेरीकरण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पुणे मुख्यालयाकडून सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो लवकरच मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाला पाठवला जाईल. या दुहेरीकरणामुळे गाड्यांचा वेग वाढून प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.हेमंतकुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग