मांडवगण फराटा: ‘दुधाला दर वाढलाय’, हे ऐकून क्षणभर समाधान वाटले तरी, वास्तव काही वेगळेच आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही खासगी आणि सहकारी दूध उत्पादक संस्थांनी दूध दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ केली आहे; मात्र या किरकोळ वाढीने दूध उत्पादक शेतकर्यांचे आर्थिक गणित जुळणार आहे का, हा खरा प्रश्न आहे.
शेतीला आधार म्हणून सुरू केलेल्या दूध व्यवसायावर आता मोठे संकट कोसळले आहे. खाद्यपदार्थांचे वाढते भाव, जनावरांच्या चार्याची टंचाई आणि दुधाचे घसरते बाजारभाव या तिढ्यात शेतकरी सापडले आहेत. (Latest Pune News)
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक शेतकर्यांनी शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय सुरू केला होता. पण गेल्या काही महिन्यांपासून दुधाचे दर गडगडल्यामुळे त्यांची परिस्थिती अडचणीत आली आहे.
दर वाढला, पण उत्पादन खर्च भागतो का?
सध्या दूध उत्पादक शेतकर्यांना6.0 फॅट आणि 9.0 एसएनएफ असलेल्या म्हैशीच्या दुधाला प्रतिलिटर 50 ते 51 रुपये, तर 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ असलेल्या गायीच्या दुधाला 32 ते 33 रुपये दर मिळतो. या दरात पशुखाद्य, औषधे, देखभाल यांचे खर्च वजा केले तर शेतकर्याच्या हातात काहीच उरत नाही. उलट अनेकांची संघाकडून गाय खरेदीसाठी घेतलेले अॅडव्हान्स आणि कर्जाचे हप्ते भरताना त्रेधा उडाली आहे.
तरुण दूध उत्पादकांमध्ये निराशा
सध्या या व्यवसायात उतरलेले अनेक तरुण संधीऐवजी अडचणीत अडकले आहेत. दुधाचे दर योग्य मिळाले नाहीत तर हे तरुण व्यवसाय बंद करून शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात टाकू शकतात. त्यामुळे आता केवळ एक रुपयाची वाढ नव्हे, तर सर्वंकष धोरणात्मक हस्तक्षेप आवश्यक आहे.
दूध म्हणजे सर्वांचा व्यवसाय, पण शेतकर्यालाच नफा नाही
एकेकाळी दुग्धव्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून समजला जात होता. परंतु आज संकलन केंद्रचालक, प्लॅन्टचालक आणि विक्रेते यांना तर पैसा मिळतो, पण दूध घालणारा शेतकरी मात्र तोट्यात आहे. दुधाचा खर्चही निघत नाही आणि त्यातच बिबट्याच्या भीतीने रात्री अपरात्री दूध संकलन केंद्रावर दूध पोचवणारा शेतकरी फक्त कष्टच करत आहे.
शासनाकडून धोरणात्मक पावले अपेक्षित
राज्य शासनाने यापूर्वी काही प्रमाणात अनुदान योजना सुरू केल्या होत्या, पण त्या नियत वेळेत पोचल्याच नाहीत आणि आता तर पूर्णपणे बंद झाल्याची शेतकर्यांची तक्रार आहे. अनुदान देण्यापेक्षा शेतकर्याच्या घामाची किंमत द्यावी, ही त्यांची स्पष्ट भावना आहे.
आता गायी विकून दूध व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. जेवढ्या किमतीला गायी घेतल्या, त्याच्या निम्म्याही किमतीला व्यापारी घेत नाहीत. अनुदानाच्या नावाखालीदेखील शेतकर्यांची फसवणूक होते. दर मिळत नाही, अनुदान मिळत नाही आणि घरखर्चही चालत नाही. अशा अवस्थेत काय करायचं?‘- पांडुरंग पवार, दूध उत्पादक शेतकरी