MHT CET Pudhari
पुणे

MHT CET Second Attempt Registration: MHT CET दुसऱ्या संधीसाठी 15-16 एप्रिलपर्यंत नोंदणीची मुदतवाढ

PCM- PCB गटासाठी विद्यार्थ्यांना दिलासा; विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम संधी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे घेण्यात येणाऱ्या पीसीएम-पीसीबी सीईटीच्या दुसऱ्या संधीसाठी नोंदणीची तारीख विलंब शुल्कासह दिनांक 15 व 16 एप्रिल अशी जाहीर केली आहे. दुसऱ्या संधीसाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनी तत्काळ नोंदणी करण्याचे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात ‌‘सीईटी सेल‌’तर्फे घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी पीसीएम समूहाच्या पहिल्या संधीची सीईटी परीक्षा सुरू आहेत. तसेच पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीची सीईटी दिनांक 21 एप्रिल 2026पासून सुरू होत आहे.

तथापी दुसऱ्या सीईटीसाठी नोंदणी न केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाकडे प्रत्यक्ष भेट देऊन, ईमेल आणि दूरध्वनीद्वारे दुसऱ्या संधीसाठी नोंदणीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. विद्यार्थ्यांची विनंती लक्षात घेऊन सीईटी कक्षाने पीसीएम व पीसीबी समूहासाठी दुसऱ्या संधीसाठी विशेष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षीपासून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या निर्णयानुसार पीसीएम व पीसीबी समूहाच्या विद्यार्थ्यांना प्रथमच प्रवेश परीक्षेच्या दोन संधी दिल्या जात आहेत.

आजपर्यंत या सीईटीसाठी दुसऱ्या संधीची नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 4 लाख 1 हजार 350 आहे. पीसीएम सीईटीच्या दुसऱ्या संधीला 2 लाख 96 हजार 553 विद्यार्थ्यांनी, तर पीसीबी सीईटीच्या दुसऱ्या संधीला 1 लाख 04 हजार 797 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, असल्याचे सीईटी सेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

दुसऱ्या संधीसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना

  • ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी नोंदणी केली नाही, ते दुसऱ्या संधीसाठी नोंदणी करू शकतात.

  • ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही संधीसाठी आधीच नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

  • ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपला अपार आयडी तयार केलेला नाही, त्यांनी तो डिजिलॉकरद्वारे तयार करावा, पण हे बंधनकारक नाही.

  • या वाढीव कालावधीत नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणतीही दुरुस्तीची सुविधा उपलब्ध नसेल. अर्ज सबमिट करण्यापूर्वी नोंदणी केलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT