MHADA Pudhari
पुणे

MHADA Pune Housing Lottery: म्हाडाच्या घरांच्या लॉटरीला सर्व्हरचा अडथळा; १८ हजार कागदपत्रे पडताळणीविना

महाआयटीच्या तांत्रिक बिघाडामुळे अर्ज रखडले; १५ ऑक्टोबर अंतिम मुदत, मुदतवाढीची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पुणे: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या घरांच्या लॉटरीसाठी अर्ज भरताना नागरिकांना मोठा तांत्रिक फटका बसत आहे. अधिवास (डोमिसाईल) आणि उत्पन्नाचा दाखला, यांसारख्या आवश्यक कागदपत्रांची बारकोड ‘महाआयटी’च्या सर्व्हरवरून पडताळणी होत नसल्यामुळे शेकडो नागरिकांचे अर्ज रखडले आहेत.

जोपर्यंत कागदपत्रे मंजूर होत नाहीत तोपर्यंत अनामत रक्कम भरून अर्ज अंतिम करता येत नाही. अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून, १५ ऑक्टोबर ही अंतिम मुदत असल्याने अर्जदारांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील ४ हजार ८६२ सदनिकांसाठी म्हाडाने लॉटरी जाहीर केली आहे.

यासाठी आत्तापर्यंत लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. सुरुवातीला ३० सप्टेंबर ही अर्ज करण्याची मुदत होती; मात्र तांत्रिक अडचणींमुळे ती वाढवून १५ ऑक्टोबर करण्यात आली. परंतु, मुदतवाढ दिल्यानंतरही सर्व्हरच्या समस्यांचा ‘ससेमिरा’ कायम राहिल्याने अर्जदारांचे हाल थांबलेले नाहीत.

  • १८ हजार अर्जांची पडताळणी बॅकएंडला प्रलंबित : कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ‘महा-आयटी’च्या प्रणालीतील बिघाडामुळे म्हाडाच्या बॅकएंडला तब्बल १८ हजारांहून अधिक कागदपत्रांची पडताळणी प्रलंबित आहे. कागदपत्रे वेळेत मंजूर होत नसल्याने एकाच अर्जदाराकडून वारंवार कागदपत्रे अपलोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सिस्टिमवरील भार आणखी वाढत असून, अर्जदारांची तारांबळ उडत आहे. त्रस्त नागरिक थेट म्हाडा कार्यालयात गर्दी करीत असून, तेथे त्यांना समजावून सांगताना अधिकार्‍यांचीही दमछाक होत आहे.

  • चूक महा-आयटीची; म्हाडाकडून पाठपुरावा सुरू : कागदपत्र पडताळणीची ही समस्या म्हाडाच्या संकेतस्थळाची नसून ‘महाआयटी’च्या सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हाडाच्या आयसीटी विभागाने या समस्येची गंभीर दखल घेतली आहे. तांत्रिक त्रुटी तत्काळ दूर करण्यासाठी महाआयटीकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

  • मुदतवाढीची शक्यता : दरम्यान, १५ ऑक्टोबरची मुदत तोंडावर आलेली असताना सर्व्हर पूर्ववत न झाल्यास अर्जदारांचे नुकसान होऊ नये म्हणून म्हाडा प्रशासन मुदतवाढ देण्याबाबत अनुकूल असल्याचे समजते. सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीवर महा-आयटीकडून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT