MHT CET Form Fee Hike Pudhari
पुणे

MH CET 2026 Registration: 6 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी, दोन संधींमुळे वाढला प्रतिसाद

पीसीएम, पीसीबी व एमबीए सीईटीला प्रथमच दोन प्रयत्न; मार्च ते मेदरम्यान परीक्षा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने यावर्षी 17 विविध पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्र माच्या प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि 5 जानेवारी 2026 पासून एमपीएड व एमएड या दोन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या नोंदणीपासून 2026 च्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीस प्रारंभ झाला. आतापर्यंत सीईटीच्या सर्व अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू असून, दि. 6 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जे विद्यार्थी यावर्षी सीईटी परीक्षा देऊ इच्छितात त्यांनी त्या सीईटी परीक्षेची अंतिम तारीख संपण्याच्या आत नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे. मागील वर्षी राज्यातून 14 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

आजपर्यंत एकूण 6 लाख 4 हजार 839 विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेला नोंदणी केली, तर प्रथमच विद्यार्थ्यास तीन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेला दोन संधी देण्यात आली आहे. यानुसार दोन संधी मिळून ही नोंदणी 8 लाख 45 हजार 708 अशी झाली आहे. या मिळालेल्या दोन संधींमुळे पीसीएम, पीसीबी व एमबीए / एमएमएस या तीन अभ्यासक्रमांच्या पहिल्या संधीच्या प्रवेश परीक्षेला 4 लाख 5 हजार 702 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, तर 2 लाख 40 हजार 869 विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेच्या दोन संधीला पसंती दिली.

आजपर्यंत प्रवेश परीक्षेसाठी सर्वात जास्त नोंदणी पीसीएम सीईटीसाठी झाली असून, 2 लाख 41 हजार 135 विद्यार्थ्यांनी प्रथम संधीसाठी नोंदणी केली आहे, तर दोन संधीसाठी 1 लाख 68 हजार 591 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पीसीबी सीईटीसाठी प्रथम संधीसाठी 1 लाख 26 हजार 578 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, दोन संधीसाठी 55 हजार 501 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

एमबीए/एमएमएस साठीदेखील प्रथम संधीसाठी 37 हजार 989 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, दोन संधींसाठी 16 हजार 777 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याखालोखाल बी.एड्‌‍. या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी 75 हजार 55

विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर एलएलबी (3 वर्षीय )साठी 49,958 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जनोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीच्या सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाईन घेतल्या जातील.

2026 च्या 17 प्रवेश परीक्षाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या 12 प्रवेश परीक्षा, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 5 प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत. या प्रवेश परीक्षा सकाळी व दुपारी या सत्रात ऑनलाईन पद्धतीने राज्यातील विविध महाविद्यालयांत घेतल्या जातील, तर काही प्रवेश परीक्षा सायंकाळच्या सत्रात देखील घेतल्या जातील. या प्रवेश परीक्षा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊन मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत चालणार आहेत.

प्रवेश परीक्षेच्या दोन संधी

राष्ट्रीय स्तरावर जेईईच्या (मेन ) दोन प्रवेश परीक्षा होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी उपलब्ध होते. तशाच दोन संधी महाराष्ट्रातील मुलांनाही मिळाव्यात म्हणून या वर्षापासून एमएच सीईटी पीसीएम, पीसीबी व एमबीए या तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) दोनवेळेस घेण्याचा निर्णय उच्च व तंत्राशिक्षणमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला. यानुसार पहिली प्रवेश परीक्षा एप्रिल-2026 मध्ये, तर दुसरी प्रवेश परीक्षा मे 2026 महिन्यात होणार आहे. विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून, दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल. जर विद्यार्थ्याने दोन प्रवेश परीक्षा दिल्यास त्याला दोन्हींपैकी ज्यामध्ये जास्त गुण असतील ते प्रवेशासाठी गृहीत धरले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT