पुणे : पुढारी वृत्तसेवा
कोणत्या मूडमध्ये कोण काय करेल याचा काही नेम नाही. मंगळवारी रात्री एका माथेफिरूने नियंत्रण कक्षाला फोन करून राज्यपालाचे निवासस्थान असलेल्या राजभवन व यशदा येथे बॉम्ब असल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्वच पोलिस यंत्रणांनी धावाधाव झाली. तपासणीअंती राजभवनात काहीही मिळाले नाही. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
पोलिस नियंत्रण कक्षाला रात्री अकराच्या सुमारास एका व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने राजभवन व यशदा परिसरात बॉम्ब असल्याचे सांगितले. राजभवन हे अतिसुरक्षित ठिकाणांपैकी एक असून, त्या ठिकाणी बॉम्बचा फोन आल्यानंतर पोलिस यंत्रणा तत्काळ कामाला लागली. काही वेळातच बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पथक व रात्र गस्तीवरील अधिकारीदेखील राजभवन परिसरात दाखल झाले.
बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तासभर राजभवनाची तपासणी केली, पण काहीही मिळाले नाही. त्यानंतर यशदा परिसराची तपासणी सुरू केली. मात्र हाती काहीच न लागल्यामुळे पोलिसांना संशय आला. शेवटी फोन करणार्या व्यक्तीची माहिती काढण्यात आली. त्याचा माग काढत असताना तो दगडूशेठ गणपती परिसरात असल्याचे आढळून आल्यानंतर तिकडे पोलिसांनी धाव घेतली. त्याला फरासखाना पोलिसांनी रात्री एकच्या सुमारास पकडल्यानंतर त्याचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचे समोर आले, पण या मनोरुग्णाच्या प्रतापामुळे पोलिसांचा चांगलाच घाम निघाला.