पुणे

Pimpri News : विसर्जन घाटांवर वैद्यकीय, अग्नीशमन पथक तैनात

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीने वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली आहे. इतर घाटांवरही जीवरक्षक, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी बुधवारी (दि.20) केले आहे.

निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव तसेच, वाल्हेकरवाडी, काळेवाडी, पिंपळे गुरव, वाकड, मोशी, चिखली, थेरगाव पूल, पिंपरी कॅम्पातील सुभाषनगर आणि सांगवी येथील विसर्जन घाट या ठिकाणी वैद्यकीय साहित्य, औषधे व रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक तैनात ठेवले आहेत. पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ब्रदर, वॉर्ड बॉय, वाहनचालक व सफाई कामगार आदींचा समावेश आहे. दीड, तीन, पाच, सात, नऊ आणि दहाव्या दिवशी विसर्जनानिमित्त तेथे वैद्यकीय पथक असणार आहे.

घाटांवर विसर्जन हौद उभारण्यात आले असून, स्वयंसेवी संस्थांमार्फत मूर्ती संकलन केले जात आहे. अग्निशमन विभागाच्या वतीने शहरातील 26 विसर्जन घाटांवर लाईफ जॉकेट, रिंग, गळ, बोट, मेगाफोन, दोरी अशा रेस्क्यू साहित्यांसह अग्निशमन पथक तैनात करण्यात आले आहे.

नागरिकांनी दक्षता घ्यावी

गणेशमूर्ती विसर्जन करताना कमीत कमी कार्यकर्त्यांनी पुढे यावे. सफाई कामगार, अग्निशमन जवान, वैद्यकीय कर्मचारी, जीवरक्षक या कर्मचार्‍यांची मदत घ्यावी. विद्युत उपकरणे व वीजवाहक तारांपासून दूर राहावे. लहान मुले, अबालवृध्द किंवा अजारी व्यक्तींनी पाण्याच्या जवळ जाऊ नये. ज्वलनशील पदार्थ पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचा विसर्जनाच्या ठिकाणी वापर करू नये. नदीच्या प्रवाहाला वेग असल्याने जास्त दूर किंवा खोल पाण्यात विसर्जनाकरिता जाण्याचा प्रयत्न करू नये. अनाहूतपणे पाण्यात बुडत आहात असे वाटत असल्यास ओरडून व हातवारे करून काठावरील जीवरक्षकांचे लक्ष वेधून घ्यावे. नशापान करुन किंवा अमली पदार्थांचे सेवन करणार्‍यांनी पाण्यात उतरू नये. जीवरक्षक व अन्य सुविधायुक्त ठिकाणीच मूर्तींचे विसर्जन करावे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT