पुणे: राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अर्थात एनएमसीने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार अखिल भारतीय कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रियेला 21 जुलैपासून, तर राज्य कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रियेला 30 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तसेच 1 सप्टेंबरपासून महाविद्यालये सुरू होणार असल्याचे एनएमसीकडून जाहीर करण्यात आले आहे.
नीट यूजी 2025 परीक्षेचा निकाल 14 जून रोजी लागून महिना उलटला तरीही वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. (Latest Pune News)
अखेर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अखिल भारतीय कोटा आणि राज्य कोट्यासाठी वैद्यकीय समुपदेशन समितीने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे एनएमसीने नीट-यूजी समुपदेशन फेरीचे वेळापत्रकानुसार अखिल भारतीय कोटा, अभिमत विद्यापीठे आणि केंद्रीय विद्यापीठासाठी समुपदेशानाची पहिली फेरी 21 ते 30 जुलैदरम्यान सुरू होणार असून, या फेरीमधील विद्यार्थ्यांना 6 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.
त्याचप्रमाणे अखिल भारतीय कोट्याची दुसरी समुपदेशन फेरी 12 ते 20 ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना 29 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. तिसरी समुपदेशन फेरी 3 ते 10 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असून, 18 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घ्यायचे आहेत.
वेळापत्रकादरम्यान शनिवार, रविवार आणि अन्य सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना देत एमसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना एनएमसीकडून सर्व वैद्यकीय महाविद्यालये व संस्थांमधील समुपदेशन अधिकार्यांना दिल्या आहेत.
अखिल भारतीय कोट्यासाठी मुक्त समुपदेशन फेरी 22 ते 26 सप्टेंबर या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे, तर राज्य कोट्यासाठी 25 ते 29 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या दोन्ही कोट्यांतर्गत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना 3 ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.
राज्य कोट्यांतर्गत फेरी 30 जुलैपासून
राज्य कोट्यांतर्गत समुपदेशन फेरीला 30 जुलै ते 6 ऑगस्टदरम्यान सुरुवात होणार असून, या समुदेशन फेरीमधील विद्यार्थ्यांना 12 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. दुसरी फेरी 19 ते 29 ऑगस्टदरम्यान आणि तिसरी फेरी 9 ते 18 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.