पुणे: लोकांना धर्म विचारून शोधून- शोधून दहशतवाद्यांनी मारले आहे. राजकीय पार्श्वभूमी नसणार्या निरपराध लोकांची, ज्यांनी आजपर्यंत कोणताही गुन्हा केला नाही, अशा सर्वसामान्य लोकांची हत्या त्यांनी केली आहे. ही घटना चीड आणणारी आहे, त्यामुळे या हल्ल्याला भारत चोख उत्तर देईल. हा बदललेला भारत आहे, अशी प्रतिक्रिया खासदार मेधा कुलकर्णी यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली.
काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांचे पार्थिव गुरुवारी (दि.24) पहाटे 4 च्या सुमारास त्यांच्या कर्वेनगरमधील घरी आणण्यात आले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या वेळी खासदार मेधा कुलकर्णी यांनीदेखील संतोष जगदाळे यांना श्रद्धांजली वाहिली.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, दहशतवाद्यांनी लोकांना धर्म विचारून शोधून- शोधून मारले आहे. ज्यांनी आजपर्यंत कोणताही गुन्हा केला नाही, अशा सर्वसामान्य लोकांची हत्या त्यांनी केली आहे. या घटनेबद्दल लोकांच्या मनात प्रचंड राग, दु:ख आणि आक्रोश आहे. याला चोख प्रत्युत्तर द्यावे, अशी त्यांची भावना आहे. भारत सरकारनेदेखील याची तयारी केली आहे.
आतापर्यंत ज्या काही पॉलिसी होत्या, त्या राबवताना आपण कुठेही नियमांचा भंग केला नाही. त्यांनी अनेक करार मोडले असतानादेखील आपण करारांचं पालन करत त्यांना प्रत्युत्तर देत आलो आहोत. पण लोकांची आता अपेक्षा आहे की याच प्रत्युत्तर सर्व सीमा पार करून दिले जावे. भारत सरकारच्या प्रत्येक कडक कृतीला भारतातील प्रत्येक नागरिक साथ देईल, अशीच नागरिकांची प्रतिक्रिया आहेत.
इथून पुढच्या काळात ज्यावेळला एका गालावर थोबाडीत मारल्यावर दुसरा गाल पुढे करण्याचे धोरण त्या सरकारच्या काळात वापरले अवलंबवले गेले असेल. मात्र, आता भारत बदलला आहे. याच उत्तर भारत प्रतिहल्ला करून देईल.