पुणे: शहरातील जीवन हलाखीचे झाले आहे. येथून हडपसरला पोहचायला जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळात माणूस मुंबईला पोहचतो. विकास आराखड्यानुसार रस्ते विकसित होत नाहीत. यामुळे निर्माण होणार्या समस्यांमुळे पुण्यातील राहणीमानाचा दर्जा खालवला आहे. अशा बुडत्या नौकेचे कॅप्टन आयुक्त असल्याची जोरदार टीका करीत खासदार डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी भाजपला ‘घरचा आहेर’ दिला आहे.
महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन खासदार डॉ. कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच शहरातील विविध प्रश्न त्यांच्या समोर मांडत ते सोडवण्याची मागणी केली. या वेळी माजी नगरसेवक जयंत भावे, राहुल शेवाळे हे भाजपचे पदाधिकारी सोबत होते. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कुलकर्णी यांनी महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. (Latest Pune News)
त्या म्हणाल्या, पुण्यातील नागरी जीवन हलाखीचे झाले आहे. नागरी इंडेक्स खालावला आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही. शहरातील समस्या सोडवण्यासाठी डॅशबोर्ड तयार करा, अशी सूचना आयुक्तांना केली आहे.
त्या पुढे म्हणाल्या, शहरातील रस्त्यांवर वाहतूककोंडी नित्याचा भाग झाला आहे. विकास आराखड्यातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी भूमिका घेतली जात नाही. विकास आराखड्याचे केवळ पंचवीस टक्के अंमलबजावणी होते.
रस्त्यांच्या कडेला असलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. अतिक्रमणावर कठोर कारवाई करावी आणि विकास आराखड्यातील रस्त्यांचे वेगाने रुंदीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना आयुक्तांना केल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.
‘झारीतील शुक्राचार्य’ कोण?
मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात प्राणांतिक अपघात होत आहेत. येथील उड्डाणपुलाच्या कामाला मंजुरी देऊन वर्ष झाले आहे, पण पुलाचे काम का होत नाही ? या पुलाच्या कामाला खोडा घालणारे ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण? असा सवाल डॉ. कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. विशेष असे की हा भाग भाजपच्या ज्येष्ठ आमदार आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पर्वती मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांचा रोख नक्की कोणाकडे आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
रूफटॉप हॉटेल्सना कोणाचा आश्रय?
कल्याणीनगर परिसरातील रूफटॉपवर बेकायदा हॉटेल्स, क्लब सुरू आहेत. तिथे मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचे सेवन होते. बेकायदा कृत्य सुरू असतात. रात्री उशिरापर्यंत साउंड सुरू असतात. येथील पन्नासहून अधिक सोसायट्यांनी याबाबत तक्रार केली आहे.
परंतु त्याकडे प्रशासन डोळेझाक करत आहे. त्यावर कारवाई करायची जबाबदारी जेवढी पोलिसांची आहे, तितकीच महापालिकेची आहे, असेही आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.
हा प्रशासनाचा दोष!
मी पुणेकरांसाठी कायमच आवाज उठवत आले आहे. आमच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी देखील आवाज उठवत असतात. पुणे बकाल झाले, हा आमचा नाही तर प्रशासनाचा दोष आहे. मी पुणेकरांच्या अपेक्षांशी प्रामाणिक आहे. मी जनतेच्या बाजूने बोलत असते. त्यामुळे आज ही मी पुणेकरांच्या बाजूने बोलते, असेही डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.