पुणे : गांजाची तस्करी करणार्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून पाच लाख 36 हजार रुपये किमतीचा 26 किलो गांजा, चारचाकी गाडी, मोबाईल असा 21 लाख 16 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Latest News)
अनिल ऊर्फ अण्णा सुभाष राख (वय 46, रा. काळेपडळ, हडपसर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी राख याच्यावर अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. खुनाच्या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याला गांजाची तस्करी करताना पोलिसांनी हांडेवाडी परिसरातून पकडल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांनी सांगितले. शहरात अमली पदार्थतस्करांच्या विरुद्ध पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. मात्र, गेल्या काही दिवसात शहरात गांजाची तस्करी वाढल्याचे दिसून येते. इतर अमली पदार्थाच्या तुलनेत गांजा हा स्वस्त आणि सहज उपलब्ध होतो. त्यामुळे गांजाला अधिक मागणी असल्याचे निदर्शनास येते. सातत्याने गांजातस्करांना पोलिस कारवाई करून पकडत आहेत. मात्र, यामागचे सूत्रधार कोण? याचा थांगपत्ता लागत नसल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक हद्दीत गस्त घालत होते. त्या वेळी पथकाला बातमीदरामार्फत माहिती मिळाली होती की, फुरसुंगी येथील कात्रज-मंतरवाडी रोडवर हांडेवाडी या भागात एक जण थार गाडी घेऊन थांबलेला आहे. तो संशयित वाटत आहे. या माहितीवरून पथकाने भागात सापळा रचून छापा टाकला.
तपासणीदरम्यान गाडीत पोलिसांना 26 किलो गांजा मिळून आला. गांजाची तस्करी करण्यासाठी वापरलेली चारचाकी गाडीदेखील पोलिसांनी जप्त केली आहे. राख याने गांजा नेमका कुठून आणला? आणि यामध्ये त्याचे साथीदार कोण? गुन्हे शाखेचे पथक या सर्व अंगांनी तपास करीत आहेत. ही कामगिरी पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलिस कर्मचारी प्रवीण उत्तेकर, विनायक साळवे, विशाल दळवी, सचिन माळवे, नागेश राख, संदीप शिर्के, सुहास डोंगरे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे यांच्या पथकाने केली.
अनिल राख सात ते आठ महिन्यांपूर्वी कारागृहातून बाहेर आला आहे. 2014 मध्ये हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून प्रकरणात त्याला अटक केली होती. या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी मोक्का कारवाईदेखील केली होती. या प्रकरणात शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा भोगून तो कारागृहाबाहेर आला होता. मात्र, आता पुन्हा तो अमली पदार्थ तस्करीत अडकला आहे. थार गाडी त्याच्या भावाची असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांनी दिली.