पुणे : गर्भवती महिला आणि नवजात बालकांच्या पोषणात सुधारणा करून माता-बाल मृत्युदर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजना राज्यातील लाखो महिलांसाठी संजीवनी ठरली आहे. गेल्या सात वर्षांत महाराष्ट्रातील 46 लाख महिलांना या योजनेअंतर्गत एकूण 1,838 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली असून, गर्भधारणेपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या काळात पोषण व आरोग्यसेवांचा लाभ मिळण्यास यामुळे मोठी मदत झाली आहे.(Latest Pune News)
केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2017-18 ते 2025-26 (जूनअखेर) या कालावधीत 46 लाख 29 हजार 119 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मातांच्या आरोग्याचे संवर्धन आणि नवजात बाळांच्या पोषणासाठी केंद्र सरकारकडून ही रक्कम थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाते. पहिल्या अपत्यासाठी 5 हजार रुपये आणि दुसऱ्या अपत्यासाठी जर ती मुलगी असेल तर 6 हजार रुपयांपर्यंतची मदत मिळते. 2022 पासून ही सवलत दुसऱ्या अपत्यासाठी (मुलगी) लागू करण्यात आली आहे. महिलांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित अटी पूर्ण केल्यानंतरच रकमेचा लाभ मिळतो.
या योजनेमुळे राज्यातील महिलांच्या आरोग्यस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असून, माता मृत्युदर आणि अल्पवजनी बालकांचे प्रमाण घटले आहे. लाभार्थींची संख्या वर्षागणिक वाढत असल्याने केंद्राने पुढील काळात निधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
मातृवंदना योजना ही महिलांच्या आरोग्य आणि पोषणासाठी प्रभावी ठरली आहे. अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणे बाकी आहे; परंतु योजना व्यापकस्तरावर यशस्वी ठरली आहे.कैलास बाविस्कर, उपसंचालक, आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग
या योजनेचा विशेष फायदा ग्रामीण भागातील आणि असंघटित क्षेत्रातील महिलांना झाला आहे. अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात आली आहे. परिणामी, गर्भवतींच्या तपासण्या, पोषणाचे प्रमाण आणि सुरक्षित प्रसूतींचे प्रमाण वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.