पुणे

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये असलेल्या ज्येष्ठांच्या जुळल्या रेशीमगाठी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तीन वर्षे 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहिल्यानंतर 70 वर्षीय शशिकांत आणि 65 वर्षीय अनुराधा (नावे बदलली आहेत) यांनी लग्न केले. दोघांनाही उतारवयात एकमेकांमध्ये आयुष्यभराचा जोडीदार सापडला आहे. सध्या या ज्येष्ठ जोडप्याप्रमाणे पुण्यात 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणार्‍या जवळपास 64 जोडप्यांनी लग्नाचे कायमस्वरूपी बंध जोडले असून, 'लिव्ह अन रिलेशनशिप'मध्ये राहिल्यानंतर ज्येष्ठ जोडप्यांनी आपल्या नात्याला नवरा-बायकोचे नाव दिले आहे. आताही काही जोडपी पुण्यात 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत आहेतच. पण, काहींनी लग्नाचे कायमचे नाते जोडले आहे आणि ते आनंदाने आपले वैवाहिक आयुष्य जगत आहेत.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तरुणांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकही 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत आहेत. पुण्यातही अनेक ज्येष्ठ नागरिक या पद्धतीने राहत असून, गेल्या दहा ते बारा वर्षांपासून हा ट्रेंड पुण्यात रुजला आहे. ज्येष्ठांना 'लिव्ह इन रिलेशनशिप'च्या नात्यात जोडण्याचे काम काही संस्था करीत असून, या संस्थांच्या पुढाकाराने अनेक ज्येष्ठ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. पुण्यात राहणार्‍या काही जोडप्यांनी लग्न केले आहे. ज्येष्ठांचा 'लिव्ह इन रिलेशनशिप'चा बंध जोडण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून हॅपी सीनिअर्स संस्थाही करीत आहे. संस्थेने घेतलेल्या पुढाकाराने 68 जोडपी 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत होती, त्यातील 64 जोडप्यांनी कायमस्वरूपी रेशीमगाठ बांधली आहे.

याविषयी 'हॅपी सीनिअर्स'चे माधव दामले म्हणाले की, 'ज्येष्ठांच्या आयुष्यात उतारवयात एकटेपण येते. अशा ज्येष्ठांना कायमस्वरूपी जोडीदार मिळावा आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाचे बंध जुळावेत, यासाठी आम्ही 2012 मध्ये ज्येष्ठांच्या 'लिव्ह इन रिलेशनशिप'ची संकल्पना राबवीत आहोत. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला विरोधही झाला. परंतु, त्यानंतर कुटुंबीयांनी याबद्दल समजूतदारपणा दाखवत ज्येष्ठांच्या 'लिव्ह इन रिलेशनशिप'ला परवानगी द्यायला सुरुवात केली आणि आता ज्येष्ठांचे कुटुंबीय आणि नातेवाईकही त्यांच्या या नात्याला स्वीकारत आहेत. 2012 सालापासून आतापर्यंत जवळपास 68 जोडपी आमच्या पुढाकाराने 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहायला लागली आणि याच्या पुढे जात त्यातील 64 जोडप्यांनी लग्न केले आहे. हा सकारात्मक बदल आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT