पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेची बहुचर्चित निवडणूक अखेर दहा वर्षांनंतर होणार असून, मसापच्या निवडणूक प्रक्रियेला 22 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. शनिवारी (दि. 27) मसापच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या 2026 ते 2031 या पंचवार्षिक निवडणुकीबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला अन् त्याला सभेला उपस्थित सभासदांनी मान्यता दिली.
आता ही निवडणूक प्रक्रिया नव्या घटनेनुसार होणार असून, 15 मार्चनंतर नवीन कार्यकारिणी अस्तित्त्वात येणार आहे. कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी निवडणुकीचा प्रस्ताव उपस्थित सभासदांसमोर मांडला. (Latest Pune News)
तसेच, निवडणुकीच्या कार्यक्रमाविषयीची माहितीही त्यांनी दिली. कुलकर्णी यांनी प्रस्ताव मांडल्यानंतर सभासदांनी निवडणूकीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर कुलकर्णी यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
ॲड. प्रताप परदेशी यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना संजीव खडके, प्रभा सोनवणे आणि गिरीश केमकर हे साहाय्य करणार आहेत, अशी घोषणा या वेळी करण्यात आली.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
मसाप पंचवार्षिक निवडणुका (2026 ते 2031)
मतदार सभासदांच्या यादीची मूळप्रत निर्वाचन मंडळाच्या स्वाधीन करणे - 22 डिसेंबर 2025
मतदारयादीतील नावे तपासण्याची मुदत - 23 ते 25 डिसेंबर
मतदारयाद्यांची अंतिम प्रत निर्वाचन अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्याची अंतिम तारीख - 27 डिसेंबर
अंतिम मतदारयादी निर्वाचन मंडळाने जाहीर करण्याची तारीख - 30 डिसेंबर
उमेदवारांसाठी आवेदनपत्र उपलब्ध होण्याचा कालावधी - 11 ते 16 जानेवारी
आवेदनपत्रे स्वीकारण्याची मुदत - 19 ते 22 जानेवारी
आवेदनपत्रांची छाननी व वैध आवेदनपत्रे जाहीर करणे - 23 जानेवारी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख - 25 जानेवारी
उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करणे - 27 जानेवारी
मतपत्रिका मतदारांकडे पाठविण्याची तारीख - 5 फेबुवारी
मतपत्रिका मतदारांकडून परत येण्याची अंतिम तारीख - 13 मार्च
निवडणुकीचा निकाल - 15 मार्च