marshal saves girl from canal
पुणे/कसबा पेठ: दोन जिगरबाज पोलिसांनी आपल्या जिवाची पर्वा न करत किर्रर्र अंधारात कालव्यातील पाण्यात उडी घेतलेल्या तरुणीचे प्राण वाचवले. सोमवारी (दि. 11) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास सावरकर चौकानजीक पाटील प्लाझाच्या समोरील मुठा नदीवरील उजवा कालव्यात हा थरार घडला. किरण पवार आणि राहुल उन्हाळे अशी पोलिस शिपायांची नावे असून, पर्वती पोलिस ठाणेअंतर्गत कॉप्स-24 मार्शल म्हणून ते कर्तव्यावर आहेत. त्यांच्या या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
पोलिस शिपाई किरण पवार आणि राहुल उन्हाळे हे दोघे नेहमीप्रमाणे पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पर्वती दर्शन पोलिस चौकीच्या परिसरात रात्री गस्त घालत होते. रात्री साडेअकरा वाजता सावरकर चौकानजीक पाटील प्लाझाच्या समोर असलेल्या मुठा कालव्याच्या पात्राजवळ पुलावर काहीतरी गडबड असल्याचे दिसून आले. (Latest Pune News)
त्यांनी तत्काळ तेथे धाव घेतली. त्या वेळी 25 वर्षीय तरुणी जाळीच्या पलीकडे जाऊन कालव्यात उडी घेण्याचा प्रयत्न करत होती. दोघे पोलिस आणि घटनास्थळी हजर असलेले नागरिक तिला कालव्यात उडी घेऊ नये म्हणून समजावून सांगत होते. परंतु तिने काही क्षणात कालव्यात उडी घेतली. दरम्यान, प्रसंगावधान राखत पोलिस कर्मचारी किरण पवार यांनी तरुणीच्या पाठीमागे पाण्यात उडी घेतली. कालव्यात किर्रर्र अंधार होता. तसचे पाण्याचा प्रवाह जास्त होता. पवार आणि उन्हाळे या जिगरबाज पोलिस कर्मचार्यांनी तरुणीला सुखरूप पाण्याच्या बाहेर काढले.
स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला होता. मात्र, सुदैवाने हे दोघे पोलिस तेथून निघाले होते. तोपर्यंत स्वारगेट पोलिसांना मुख्य नियंत्रण कक्षाकडून या घटनेची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्वारगेट पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी तरुणीला धीर दिला. विवाहित असलेली तरुणी पतीपासून वेगळी राहते. तिला दोन मुले आहेत. सध्या कामाच्या निमित्ताने ती मैत्रिणीसोबत राहते. मानसिक तणाव आणि नैराश्यातून तिने कालव्यात उडी घेतल्याचे पोलिसांना सांगितले. वैद्यकीय उपचारानंतर सुखरूप असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम यांनी सांगितले.
प्रत्येकी दहा हजार रुपयांचा रिवॉर्ड
दोन पोलिस कर्मचार्यांनी तरुणीचे प्राण वाचविताना दाखविलेल्या धाडसाची दखल घेत, त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे रिवॉर्ड करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले. तसेच पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी देखील त्यांचा गौरव केला.
रात्रीचे साडेअकरा वाजले होते. कालव्याच्या ठिकाणी लाईट नव्हती. किर्रर्र अंधारात अचानक तरुणीने पाण्यात उडी मारली. कोणताही विचार न करता तिच्या मागोमाग कॅनॉलमध्ये उडी घेतली. प्रवाहासोबत दोनशे ते अडीचशे मीटर वाहत गेलो. पुढे काटेरी झुडुपांमध्ये अडकलो. काही मिनिटांत तरुणीला बाहेर काढले.- किरण पवार, बीट मार्शल कॉप्स- 24