पणन विभागाच्या अखत्यारीत सहकारी संस्थांचे कामकाज पणनमंत्री पाहणार
ग्राहक सहकारी, खरेदी-विक्री संघासह प्रक्रिया संस्थांसाठी महत्त्वाचा निर्णय
शासनाच्या आदेशान्वये कामकाजात सुसूत्रता आणण्यास प्राधान्य
पुणे: राज्याच्या पणन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या ग्राहक सहकारी संस्था, सहकारी खरेदी-विक्री संघ, जिनिंग व प्रेसिंग संस्था, सहकारी प्रक्रिया संस्था, फळे व भाजीपाला व इतर सर्व पणन प्रक्रिया सहकारी संस्था, तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 व नियम 1961 अन्वये स्थापन पणन सहकारी संस्था या सर्व संस्थांशी संबंधित वैधानिक कामकाज पणन विभागामार्फत पणन मंत्री यांच्या मान्यतेने करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे यापुढील सहकार मंत्र्यांसमोर चालणारी याबाबतची अपिले ही पणनमंत्र्यांसमोर चालविली जातील. (Latest Pune News)
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातंर्गत सहकारी संस्थांच्या वैधानिक कामकाजासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 व नियम 1961 हा अधिनियम आहे. तथापि, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत सहकार, पणन व वस्त्रोद्योग हे तीन स्वतंत्र उपविभाग आहेत. या सर्व उपविभागांसाठी स्वतंत्र मंत्री आहेत.
त्यामुळे पणन विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या पणन सहकारी संस्थांचे वैधानिक कामकाज पणन विभागामार्फत पणन मंत्री यांच्या मान्यतेने करणे आवश्यक असल्याने नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामुळे संबंधित पणन संस्थांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. शिवाय शासनाच्या आदेशामुळे पणन संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासही मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.