Marathi Sahitya Sammelan Pudhari Photo
पुणे

Marathi Sahitya Sammelan: साहित्य संमेलनाच्या कवी कट्ट्यासाठी कवितांचा वर्षाव!

1760 कविता प्राप्त; वेगवेगळ्या विषयांवरील 400 उत्कृष्ट कवितांची होणार निवड

पुढारी वृत्तसेवा

पुणे : सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवी कट्ट्यासाठी तब्बल 1760 कवितांचा वर्षाव संयोजकांवर झाला. महत्प्रयासाने त्यातील 400 कवितांची निवड करण्यात येणार आहे. साहित्य संमेलनाच्या कवी कट्ट्यावर बालकवी, तरुण कवी आणि ज्येष्ठ कवींच्या कवितांची बरसात होणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवी कट्ट्यावर आपली कविता सादर व्हावी, अशी प्रत्येक कवीची इच्छा असते. प्रत्येक संमेलनात रंगणाऱ्या या कवी कट्ट्यावर फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील कवी विविध विषयांवरील कविता सादर करतात अन्‌‍ या कवितांना संमेलनाला उपस्थित रसिकांचीही दिलखुलास दाद मिळते. महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1 ते 4 जानेवारी दरम्यान रंगणार असून, साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे देशातील विविध राज्यातून सुमारे 1762 कविता प्राप्त झाल्या असून, कोणी ई-मेलद्वारे तर कोणी टपालद्वारे कविता पाठवल्या, त्यातील 400 कवितांची निवड करण्यात येणार आहे.

याविषयी साहित्य संमेलनातील कवीकट्टा उपक्रमाचे प्रमुख राजन लाखे म्हणाले, महिन्याभरापूर्वी कवींना निवेदनाद्वारे कविता पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आम्हाला महाराष्ट्रातूनच नव्हे तर विविध राज्यातील कवींच्या कविता प्राप्त झाल्या. सध्या कट्ट्यासाठी कवितांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कवीकट्ट्यामध्ये निवड झालेल्या कवींना दूरध्वनी, टपाल आणि ई-मेलद्वारे कवितेची निवड झाल्याची माहिती कळविण्यात येईल. कविता पाठविण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर होती. कविता पाठविण्याची मुदत आता संपलेली आहे.

रोज अंदाजे 80 कविता सादर होणार

सातारा येथे होणाऱ्या 99 व्या साहित्य संमेलनात दिवसभर कवीकट्टा रंगणार आहे. चार दिवसीय संमेलनात कट्ट्यावर रोज अंदाजे 80 कविता सादर होतील. विदर्भ, कोकण, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्र अशा सहा विभागातून कवींच्या कवितांची निवड करण्यात येत असून, अभिजात मराठी, निसर्गावरील कविता, मायमराठीचे महत्त्व उलगडणाऱ्या कविता, सामाजिक विषयांवरील कविता, संस्कृती-परंपरेवर आधारित कविता, प्रेमकविता अशा वेगवेगळ्या विषयांवरील कविता कट्ट्यावर सादर होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT