गणेश खळदकर
पुणे: राज्यात अन्य कोणत्याही भाषेची सक्ती नाही, सक्ती आहे ती मराठी भाषेची, अशी वल्गना करण्यात येत असली तरी केंद्रीय विद्यार्थी संघटन अर्थात केव्हीएस शाळा, सैनिकी शाळांसह अन्य काही शाळांमध्ये मराठी हा विषयच शिकवला जात नाही. त्याऐवजी हिंदी आणि संस्कृत विषयांचे पर्याय विद्यार्थ्यांना दिले जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.
राज्य मंडळांच्या शाळांसह सीबीएसई, सीआयएससीई, आयबी यांसह अन्य बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित मंडळांच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकवणे अनिवार्य आहे. (Latest Pune News)
परंतु संबंधित मंडळांच्या काही शाळा आणि केंद्रीय विद्यार्थी संघटन अर्थात केव्हीएस शाळा, सैनिकी शाळांमध्ये मराठी विषय शिकवलाच जात नसल्याचे दिसून येत आहे. संबंधित शाळांमधील शिक्षकांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी दिलेल्या
माहितीनुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, दोन भारतीय भाषा आणि एक परदेशी भाषा शिकवण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार केव्हीएस शाळा आणि सैनिकी शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याऐवजी हिंदी आणि संस्कृत भाषा शिकवण्यात येत आहे. तर परदेशी भाषा म्हणून इंग्रजी भाषा शिकवण्यात येत आहे. त्यामुळे मराठी भाषा शिकवण्याचा विषयच येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सैनिकी शाळांमध्ये शिकवणार्या एका शिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, सैनिकी शाळांमध्ये विशेष करून भारतीय लष्करातील सैनिकांची मुले शिक्षण घेत असतात. संबंधित सैनिकांची देशातील विविध राज्यांमध्ये सतत बदली करण्यात येते. त्यामुळे देशस्तरावर ज्या भाषा शिकवल्या जातात अशाच भाषा विद्यार्थ्यांना शिकवण्याचे धोरण आहे.
त्यानुसार देशातील बहुतांश राज्यात शिकवण्यात येणारी हिंदी भाषा विद्यार्थ्यांना शिकवण्यात येते. तर संस्कृत भाषेला प्राचिन भाषा मानली जात आहे. त्यामुळे बौध्दिक तत्वज्ञानाचे दस्तऐवज आजही संस्कृत भाषेत उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांना संबंधित भाषा अवगत असावी म्हणून विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे ज्ञान देण्यात येत असल्याचे संबंधित शिक्षकाने स्पष्ट केले आहे.
तसेच केव्हीएस शाळांमध्ये देखील केंद्रीय कर्मचारी तसेच अधिकार्यांची मुले शिक्षण घेत असतात. त्यांची देखील ठराविक वर्षांनी बदली होते. त्यामुळे देशस्तरावर ज्या भाषा शिकवल्या जातात अशाच भाषा विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत असल्याचे संबंधित शिक्षकाने स्पष्ट केले आहे.
...तर शिकता येते मराठी
केंद्रीय विद्यार्थी संघटन अर्थात केव्हीएस शाळा, सैनिकी शाळांमध्ये मराठी भाषा शिकण्यासाठी किमान 25 हून अधिक विद्यार्थी संबंधित विषय शिकण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थी तसेच पालकांना मराठी भाषा शिकावी असे वाटते. त्यांनी संबंधित शाळांच्या व्यवस्थापनाला तसे निवेदन देणे गरजेचे असल्याची माहिती एका शिक्षकाने दिली आहे.
मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांची गळचेपी
केंद्रीय विद्यार्थी संघटन अर्थात केव्हीएस शाळा, सैनिकी शाळांमध्ये केंद्रीय कर्मचारी तसेच सैनिकांची मुले शिक्षण घेत असली तरी यामध्ये मराठी लोकांचा टक्का देखील लक्षणिय आहे. त्यामुळे अशा लोकांची मुले ज्यावेळी संबंधित शाळांमध्ये शिक्षण घेतात. त्यावेळी त्यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व संपुष्टात येते आणि महाराष्ट्रात जन्म झालेला असूनही त्यांना मराठी भाषा स्पष्टपणे बोलता येत नाही. त्यामुळे या शाळांमध्ये मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांची गळचेपीच होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राज्यात मराठी भाषा विषय शिकवणे हे सक्तीचे तसेच अनिवार्य आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही शाळांना संबंधित धोरणाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. यासाठी केंद्रीय विद्यार्थी संघटन अर्थात केव्हीएस शाळा, सैनिकी शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जावी, यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.- शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय