इंदापूर: मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा पेटले असून, मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. तो प्रश्न शेतीशी संबंधित असून शेती व्यवसायाचा दुय्यम धंदा पशुपालनाचा आहे, तोही गोरक्षक करू देत नाहीत. मराठा समाज कर्जबाजारी आणि यातूनच अनेक युवक आत्महत्या करीत आहेत. मनोज जरांगे यांनी चर्चेतून मार्ग काढावा. संपूर्ण राज्य तुमच्या चर्चेकडे आस लावून बसले असल्याचे मत विधान परिषदेचे आमदार, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
इंदापूर येथे न्यायालयीन कामकाजासाठी आल्यानंतर खोत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्य स्थापनेपासून झालेल्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या युवकांसाठी फार काही केले नाही. केवळ शेतीचं पाणी,अनुदान दिलं मात्र शिक्षण, नोकरी आरक्षणात पाटील, देशमुख आणि पवार यांनी आरक्षण दिले नाही. (Latest Pune News)
मराठा समाजाची लेकरं जिल्हाधिकारी, तहसीलदार होऊन आमच्या पंक्तीला बसावं असं यांना वाटलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र एकदा नव्हे तर दुसर्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिल आहे. यावेळी रयत क्रांती पक्षाचे राज्याध्यक्ष प्रा. सुहास पाटील, रयत सेनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश देवकर, तालुकाध्यक्ष अभिमन्यू शिंदे हे उपस्थित होते.
शेतकर्यांच्या गोठ्याला गोशाळा अनुदान द्या
प्रत्येक शेतकर्यांचा गोठा गोशाळा समजावी. गोशाळेला जितके अनुदान देता तितकेच अनुदान शेतकर्यांच्या गोठ्यात जेवढी जनावरे आहेत, त्यांना प्रत्येकी पाचशे रुपयेप्रमाणे अनुदान दिवसाला द्यावे. यापूर्वी गोशाळेविरोधात कोण बोलत नव्हते मात्र आता शेतकर्यांच्या नरडीला आल्याने बोलणे भाग पडत आहे.