पुणे

Pimpri News : ‘ओबीसी आरक्षणात वर्गवारी करून मराठा समाजास न्याय द्यावा’

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांहून अधिक करावी. मराठा समाज ओबीसी वर्गात आरक्षण मिळण्याच्या सर्व अटी पूर्ण करतो. त्यामुळे ओबीसी प्रवर्गात वर्गवारी करून मराठा समाजास आरक्षण द्यावे. असे मत डॉ. भानुसे यांनी पिंपरीतील आचार्य अत्रे सभागृहात आयोजित सामाजिक सलोखा आरक्षण परिषदेत व्यक्त केले. परिषदेत प्रा. सुभाष वारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, डॉ. शिवानंद भानुसे, प्रविण गायकवाड, प्रकाश जाधव, अजित चौगुले, मारुती भापकर, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, अंजुम ईनामदार आदींसह पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणार्‍या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. भानुसे म्हणाले की, वर्गवारी विषयाची संकल्पना रोहिणी आयोगाने मांडली आहे. असे केल्याने मराठा समाज व ओबीसी समाज दोघांनाही न्याय मिळेल. प्रकाश जाधव म्हणाले की, राज्यात आरक्षणाच्या मागणीने जोर धरला असून मराठा, ओबीसी, धनगर समाजासह विविध समाज वेगवेगळी आंदोलने करत आहेत. विविध समाजाचे काही नेते चिथावणीखोर वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे समाजात जातीय विद्वेष वाढत आहे. तो कमी व्हावा व सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, यासाठी महाराष्ट्रात प्रथमच सामाजिक सलोखा आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले.

कलम 41 नुसार भारतात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला सरकारने रोजगार हक्क दिला पाहिजे. आरक्षित प्रवर्गाच्या त्या वर्गातील अंतर्गत आरक्षण नीट होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे. तसेच जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे असे मत प्रा. वारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वाघमारे तर आभार संपत पाचुंदकर यांनी मानले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT