पुणे : मनोज जरांगे मुख्यमंत्री देवेंद्र फदणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरत आहेत. मुख्यमंत्री कोणत्या हतबलतेतून जरांगे यांच्यावर कारवाई करण्यास धजावत नाहीत? जरांगे यांच्या धमकीवजा भाषेमुळे कायदा सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यांचे वर्तन नक्षलवादाच्या वाटेवर जाणारे आहे.’ असा गंभीर आरोप ओबीसी नेते ॲड. मंगेश ससाणे यांनी केला आहे. सोमवारी (दि. २५) पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ‘सरकार त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हा का दाखल करत नाही?’ असा प्रश्नही उपस्थित केला. तसेच ‘सरकारने कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू करावी,’ अशी मागणीही करण्यात आली.
मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्रींबाबत केलेले विधान, त्यांची सत्ता उलटवून टाकण्याची भाषा आदी मुद्द्यांचा ॲड. ससाणे आणि ओबीसी कार्यकर्त्यांनी समाचार घेतला. ‘भाजपाचा डीएनए ओबीसी असून पंतप्रधान स्वतः ओबीसी समाजातून आलेले आहेत. मात्र मनोज जरांगे यांचे आंदोलन ओबीसींच्या हक्कांवर गदा आणणारे आहे. त्यांचा संघर्ष आरक्षणासाठी नसून, प्रस्थापित राजकीय फायद्यासाठी आहे,’ असा आरोप त्यांनी केला.
ससाणे म्हणाले, ‘ओबीसी आरक्षण हे मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास व सर्वेक्षणावर आधारित आहे. राज्य सरकारने कुणबी समाजासाठी 10 टक्के आरक्षण आधीच दिले आहे. आता जरांगे पुन्हा काय मागत आहेत हेच कळत नाही. आरक्षणाच्या नावाखाली ते समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत. त्यांची खरी जागा तुरुंगामध्ये आहे.’
‘ओबीसी आरक्षणात छेडछाड झाली तर आम्हाला आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागेल. आम्ही न्यायासाठी उभे आहोत. पण जरांगे यांच्या धमकीशाहीला थारा दिला, तर महाराष्ट्र अस्थिर होईल. सरकारने तातडीने कडक कारवाई करावी,’ अशी मागणी केली. यावेळी त्यांनी ओबीसी आमदारांवरही टीका केली. ‘ज्या आमदारांना ओबीसी मतदारांनी निवडून दिले, ते गप्प बसले आहेत. एकातही विरोध करण्याची हिंमत नाही,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मागील आंदोलनात राज्याने प्रचंड जाळपोळ, तोडफोड आणि हिंसा पाहिली. गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहेत, अशा काळात पुन्हा गोंधळ घालण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्र पेटवण्याचा डाव आहे. पाचवी पास झालेला व्यक्ती मंत्र्यांना धमक्या देतो, आमदारांना शिवीगाळ करतो, त्यांच्यावर झुंडशाही लादतो, तरीही सरकार गप्प आहे. हे वर्तन लोकशाहीस घातक असून नक्षलवादाच्या मार्गावर नेणारे आहे.
जरांगे यांनी आंदोलनासाठी बडे उद्योजक, कंपन्या यांच्याकडून लाखो–कोट्यवधी रुपये गोळा केले आहेत. मागील आंदोलनातील गैरव्यवहार आणि हिंसाचार याची चौकशी करण्यासाठी संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमली आणि तपशीलवार अहवालही तयार झाला. त्याचे पुढे काय झाले ते कोणालाही माहीत नाही.