आळेफाटा: मराठा आरक्षण प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर अंतर्वली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांचे गुरुवार (दि 28) पहाटे सव्वापाच वाजण्याच्या समोरास आळेफाटा (ता जुन्नर) येथे आगमन झाले. फुलांची उधळण करत, फटाक्यांच्या आतषबाजीत, एक मराठा लाख मराठाच्या जयघोषणात त्यांचे येथे भव्य असे स्वागत करण्यात आले.
गुरूवारी पहाटेच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांचे पुणे जिल्ह्यात आगमन झाले. जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आणे, पेमदरा, बेल्हे, राजुरी व ठिकठिकाणी स्वागतानंतर ते आळेफाटा परिसरात आले. आळे, संतवाडी, कोळवाडी, आळेफाटा, वडगाव आनंद येथील सकल मराठा समाज व सर्व समाज बांधव यांचे वतीने भव्य असे स्वागत करण्यात आले. (Latest Pune News)
एकूण 40 जेसीबीतून त्यांच्यावरती फुलांची उधळण करण्यात आली. आळेफाटा चौकातील एक मराठा लाख मराठा या व इतर घोषणांनी आळेफाटा परिसर पहाटेच्या सुमारास दणाणून गेला होता.
आळेफाटा चौकात थांबल्यानंतर त्यांनी उपस्थित सर्वांना अभिवादन केले आणि चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती पुष्पगुच्छ केली. अगदी रात्रभर येथे सर्व समाज बांधव जागे होते. काल सायंकाळ पासूनच अहिल्यानगर कल्याण महामार्गाने मुंबईच्या दिशेने मोठ्या संख्येने मराठी समाज बांधव वाहनांतून जाऊ लागली आहेत.
लवणवाडी, लवणमळा, बोरीफाटा, आळे स्टॅन्ड, आळे दुध डेअरी, मार्केट यार्ड, आळेफाटा, बाह्यवळण पुल व वडगाव आनंद येथे येणा-या बांधवांना पाणी, बिस्किट, दुध यांची व्यवस्था करण्यात आली होती. आळेफाटा नंतर वडगाव आनंद येथेही मनोज जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले. आळेफाटा पोलिस ठाण्याचे वतीने हद्दीतील सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.