Manikrao Kokate on agriculture ministry change
पुणे: राज्यातील विविध ठिकाणी केलेली वादग्रस्त वक्तव्ये आणि विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने टीकेचे धनी झालेले माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते बदलून त्यांना क्रीडा, युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर त्यांचे कृषी खाते दत्तात्रय भरणे यांना देत खाते बदल केल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला आहे, तो मला मान्य आहे. मी अजिबात नाराज नसून आनंदी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. (Latest Pune News)
कोकाटे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माझे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे.
त्या निर्णयाप्रमाणे माझी पुढे वाटचाल सुरू राहणार आहे. दत्तात्रय भरणे हे शेतकरी पुत्र असून ते जाणकार व मोठे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे कृषी खाते दिले असून, ते त्यास निश्चित न्याय देतील आणि त्या खात्यामध्ये काही गरज पडली तर मी त्यांना शंभर टक्के मदत करणार आहे.
भरणे यांचे क्रीडा व अन्य खाती मला दिलेले आहे. त्यात मला दत्तात्रय भरणे यांची गरज पडली तर त्यांचा सल्ला जरूर घेणार आहे आणि अतिशय उत्कृष्ठ काम करण्याचा प्रयत्न करेन, असेही कोकाटे म्हणाले.