पुणे: मान्सून दाखल झाल्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने पुणेकरांकडून कर्नाटकी आंब्याला मागणी होत आहे. एकीकडे पावसामुळे कर्नाटकातील स्थानिक बाजारपेठांत आंब्याचे दर कोसळले आहेत, तर दुसरीकडे पुण्याच्या बाजारपेठेत आंब्याला चांगले दर मिळत आहेत.
त्यामुळे कर्नाटकातील शेतकर्यांनी आंबा पुण्याच्या बाजारपेठांकडे पाठविण्याचा सपाटा लावला आहे. परिणामी, यंदा पहिल्यांदा हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात रविवारी (दि. 15) बाजारात आंब्याची दहा हजार पेट्या आणि सहा हजार क्रेटमधून विक्रमी आवक झाली. (Latest Pune News)
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ विभागात कर्नाटकातील टुमकूर भागातून हापूस, पायरी, लालबाग आणि बदाम आंबा दाखल होत आहे. दरवर्षी 20 जूनपर्यंत कर्नाटक आंब्याचा हंगाम आटोपतो. या काळात अवघी एक ते दोन हजार पेट्यांवर आवक होते. यावर्षी त्यापेक्षा लवकर हंगाम संपेल, असे चित्र निर्माण झाले होते.
कारण, मागील हंगामात झालेला अधिकचा पाऊस, त्यानंतर लांबलेला परतीचा पाऊस आणि नंतर कमी प्रमाणात थंडी पडल्याने त्याचा आंब्याच्या झाडांवर परिणाम झाला होता. त्यानंतर आलेल्या वादळात झाडांचा मोहर गळून पडला होता. या सर्व कारणांमुळे यंदा कर्नाटकातील झाडांना फळधारणा कमी होती. त्यामुळे या वेळी कर्नाटक हापूसचा हंगाम उशिराने सुरू झाला होता.
एप्रिल महिन्यापर्यंत आवक मर्यादित होती. मात्र, मे महिन्यात मोठ्या प्रमाणात आवक वाढली. त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने या आंब्याला पावसाचा मोठा फटका बसला. पावसामुळे मागणी कमी झाली तसेच दरही कमी होते. पावसाच्या तडाख्यामुळे लवकर आंब्याचा हंगाम संपेल, असे चित्र निर्माण झाले होते.
मात्र, मान्सूनच्या दमदार आगमनानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे पुणेकरांनी पुन्हा आंब्याची खरेदी सुरू केली. या काळात कोकणातील हापूस व गावरान आंबा उपलब्ध नसल्याने कर्नाटक आंब्याकडे पुणेकरांचा कल राहिला. परिणामी, त्याच्या दरातही वाढ झाली. पावसाच्या विश्रांतीमुळे पुणेकरांचा हा कल अद्याप टिकून असल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात आले.
गुलटेकडी मार्केट यार्डातील आंब्याचे दर
आंबा (डझन/ किलो) घाऊक दर
हापूस (3 ते 5 डझन) 600 ते 1000 रु.
पायरी (4 डझन) 500 ते 700 रु.
लालबाग (1 किलो) 20 ते 30 रु.
स्थानिक बाजारपेठांमध्ये आंब्याला जागेवर उठाव नाही. पल्प उत्पादकांनी आंब्याची खरेदी सुरू केली असून, त्यांनी 8 ते 9 रुपये किलो दराने आंब्याची खरेदी सुरू केली आहे. जी गेल्या वर्षी 40 ते 45 रुपये इतकी होती. त्यामुळे शेतकरी पुण्याच्या बाजारपेठेत आंबा विक्रीसाठी पाठवत आहेत. आंब्याची आवक वाढली असून, त्याच्या मागणीतही वाढ झाली आहे. यंदा पहिल्यांदाच हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात चांगले दरही मिळत आहेत.- रोहन उरसळ, कर्नाटक आंब्याचे व्यापारी, मार्केट यार्ड