पुणे: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना सध्या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये काही कीटकनाशक कंपन्या आणि त्यांच्या अधिकृत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना चुकीची किंवा भेसळयुक्त औषधे दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावरुन येत्या गुरुवारी (दि.9) कृषि आयुक्तालयात दुपारी 12 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी, आंबा बागायतदार शेतकरी आणि संबंधित कीटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक कृषी विभागाचे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर यांनी बोलविली आहे.
शेट्टी यांनी आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीच्या प्रश्नांवर आवाज उठविला आहे. तसेच कीटकनाशक कंपन्यांकडून चुकीची कीटकनाशके व औषधे पुरविल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून संबंधित औषध कंपन्यांवर कारवाई करुन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी आणि तक्रार शेट्टी यांनी दिनांक 4 एप्रिल रोजी कृषी विभागाकडे केली होती. त्यानुसारच ही संयुक्त बैठक बोरकर यांनी आयोजित करण्यात आली आहे.
शेट्टी यांनी निवेदनात म्हटले आहे की, अनेक कंपन्यांनी औषधांच्या विक्रीचे दर वेगवेगळे लावून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली आहे. अनेक कंपन्यांनी शेतकऱ्यांना रोखीने खते, किटकनाशके घेतल्यास एमआरपी किंमतीच्या 50 टक्के सवलत देवून औषधे विक्री करत आहेत. यामुळे स्थानिक दुकानदार व औषध कंपन्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नफा मिळवित आहेत. या सर्व कंपन्यांची नांवेच त्यांनी कृषि विभागास दिली आहेत. बैठकीस आमदार बाळा माने, आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित राहणार असल्याचेही शेट्टी यांनी कळविले आहे.