पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि जिल्ह्यातील एक वादग्रस्त राजकीय व्यक्तिमत्व असलेल्या पैलवान मंगलदास बांदल यांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. मंगळवारी पहाटे ईडीने बांदल यांच्या शिक्रापूर आणि पुण्यातील महंमदवाडी या निवासस्थानांवर छापे टाकले होते. पुण्यातील महंमदवाडी येथील निवासस्थानी बांदल यांची सुमारे १६ ते १७ तास चौकशी केल्यानंतर ईडीने रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेऊन मुंबई कार्यालयामध्ये घेऊन गेले आहेत.
काही कोटीतील रोख रक्कम, आलिशान गाड्या आणि लाखो रुपयांची मनगटी घडाळे इडीने जप्त केली असल्याचे समजते. बांदल यांच्या अटकेमागे नक्की काय राजकीय कनेक्शन आहे, याची पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवर बांदल यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात उभे राहण्याची तयारी केली होती. त्यांनी वंचितची उमेदवारी मिळवलेली होती, परंतु नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या इंदापूर येथील भाजपच्या मेळाव्याला हजर राहिल्याने वंचितने त्यांची उमेदवारी रद्द केली. त्यानंतर बांदल यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा बारामतीत तर शिवाजीराव आढळराव यांचा शिरूरमध्ये प्रचार केला. बांदल नक्की कोणत्या पक्षात आहेत, याबद्दल नेहमीच गूढ असे; ते कधी कोणत्या पक्षात जातील याची कोणीही खात्री देत नसे, परंतु सध्या ते महायुतीमध्ये आहेत असाच राजकीय क्षेत्रामध्ये समज होता. बांदल यांच्यावर ईडी कारवाई झाल्याने मात्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
आगामी निवडणुकीत शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये बांदल स्वतः किंवा त्यांच्या पत्नी उभे राहण्याच्या तयारीत होते. यापूर्वी शिवाजी भोसले सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी बांदल प्रदीर्घकाळ येरवडा तुरुंगात होते. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. यापूर्वीही ईडीने त्यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीसाठी चार वेळा ते हजरही झाले होते. त्यानंतर ईडीने ही कारवाई केलेली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कारवाई झाल्याने पुणे जिल्ह्यात अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. बांदल यांच्या पाठीमागे नक्की कोण लागले आहे आणि कशामुळे ही कारवाई झालेली आहे, यावर चर्चा सुरू आहे.