पुणे: मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसोबत अनेक हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्याची देशपातळीवर असणारी प्रतिमा काहीशी मलिन झाल्याचे पाहायला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर यंदा शाळा सुरू होण्यापूर्वीच राज्य सरकारने सावध पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने राज्यभरातील सर्व शाळांना नवीन नियम लागू केले आहेत.
नव्या नियमानुसार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बसचालकांची पार्श्वभूमी तपासली जाणार आहे. दर आठवड्याला त्यांची मद्यपान व औषध चाचणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय विभागाने जाहीर केलेले नवीन नियम राज्यातील सर्वच शाळांना लागू केले आहेत. (Latest Pune News)
शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार चालक, सफाई कामगार, महिला सेविकांची सकाळी आणि सायंकाळी अशी दोन वेळेस चाचणी होणे गरजेचे आहे. अनधिकृत व्यक्तींना बसमध्ये प्रवेश करता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच, खासगी वाहनांमधून येणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चालकाची ओळख व पार्श्वभूमी शाळेला कळवावी, अशी सूचनाही शासन निर्णयामध्ये केल्या आहेत.
तसेच, पालकांनी चालकांची वैयक्तिक माहिती स्वत:कडे ठेवावी, चालकांची पार्श्वभूमी तपासून घ्यावी. तसेच, बेपर्वा ड्रायव्हिंग आणि चालकाच्या भूतकाळातील अपघाताच्या घटनांचीही माहिती करून घ्यावी. विद्यार्थ्यांसाठी खासगी वाहतूक व्यवस्थेचा वापर करणार्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाला चालकाची पडताळणी आणि ओळख तपशीलांची माहिती देणे आवश्यक आहे.