Manchar Nagar Panchayat Pudhari
पुणे

Manchar Majhi Vasundhara Abhiyan 5.0 Award: ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’मध्ये मंचर नगरपंचायतीला राज्यात प्रथम क्रमांक

3 कोटींचे बक्षीस जाहीर; वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धन उपक्रमांची राज्यस्तरीय दखल

पुढारी वृत्तसेवा

मंचर: पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‌‘माझी वसुंधरा अभियान 5.0‌’मध्ये 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीसाठी मंचर नगरपंचायतीने 15 हजार ते 25 हजार लोकसंख्या गटात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या पुरस्कारासोबत शहरास 3 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.

मागील 3 वर्षांत नवनिर्मित नगरपंचायत असलेल्या मंचर शहराने द्वितीय आणि यावर्षी प्रथम, असा केलेला प्रवास उल्लेखनीय आहे. ‌‘माझी वसुंधरा‌’ अभियानांतर्गत पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश, या पंच महाभूतांवर आधारित पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीचे कामकाज केले जाते.

या दोन्ही अभियानांतर्गत मंचर शहरात दीड लाखापेक्षाही अधिक वृक्ष लागवड झाली आहे. अण्णासाहेब आवटे महाविद्यालय येथे मियावाकी टप्पा 1 व 2, अशा एकूण 15 एकर क्षेत्रावर आणि निघोटवाडी परिसरात बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये एक मियावाकी उद्यान उभारण्यात आले आहे. तसेच, आवटे महाविद्यालय परिसरातील तीनही बंधाऱ्यांची स्वच्छता करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन आणि जनजागृतीसाठी देखील शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले.

‌’माझी वसुंधरा अभियान 4.0‌’मध्ये द्वितीय क्रमांकासाठी 2 कोटी रुपये व उंच उडीसाठी 1 कोटी रुपये, असे 3 कोटी रुपये व 5.0 मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक म्हणून पुन्हा 3 कोटी रुपये बक्षीस रक्कम जाहीर झाली आहे. यातून पुन्हा मंचर शहरात मोठ्या प्रमाणावर पर्यावरणासाठी कामे करण्यात येणार आहेत. मुख्याधिकारी म्हणून गोविंद जाधव यांचा हा चौथा पुरस्कार ठरला आहे.

‌‘माझी वसुंधरा अभियान 1.0 व 2.0‌’मध्ये कर्जत नगरपंचायतीला अनुक्रमे द्वितीय व प्रथम पुरस्कार आणि 4.5 कोटींचे बक्षीस; तर मंचर नगरपंचायतीला ‌‘माझी वसुंधरा अभियान 4.0 व 5.0‌’मध्ये अनुक्रमे द्वितीय आणि प्रथम पुरस्कार व एकूण 6 कोटी रुपये बक्षीस म्हणून जाहीर झाले. या सर्व अभियान कालावधीत दोन्ही शहरांत मिळून अडीच लाख वृक्षांचे रोपण आणि संवर्धन झाले आहे. कर्जत शहरात 5 व मंचर शहरात 3 मियावाकी उद्याने उभारण्यात आली आहेत.
गोविंद जाधव, मुख्याधिकारी, मंचर न.प.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT