Guar Pudhari
पुणे

Guar Crop Price Crisis: मंचर गवार उत्पादक संकटात; कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांचा नफा घटला

उन्हाळी पिकाला अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकरी अडचणीत; जुलैमध्ये दर वाढीची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली

पुढारी वृत्तसेवा

मंचर: आंबेगाव तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात घेतलेल्या गवार पिकाला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. कष्ट आणि खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर कमी असल्याने उत्पादनातून फारसा नफा राहत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सध्या बाजारात चांगल्या प्रतीच्या गवारीला दहा किलोमागे ४५० ते ५०० रुपये दर मिळत आहे. मात्र, दरवर्षी याच कालावधीत गवारीला ६०० ते ७०० रुपये दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गतवर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने तसेच फेब्रुवारी-मार्चपर्यंत पाणीसाठा उपलब्ध असल्याने अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी गवार लागवड केली होती.

यंदा मात्र वाढत्या उष्णतेमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे पिकाला आवश्यक पाणी देता आले नाही. परिणामी, गवारीच्या शेंगा अपेक्षित प्रमाणात फुगल्या नसल्याने उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. याचा थेट परिणाम बाजारभावावरही दिसून येत आहे.

गवार पिकासाठी एकरी बियाणे, खुरपणी, औषध फवारणी, मजुरी आणि तोडणीसाठी अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च येतो. सध्या गवार तोट्यात नसली, तरी खर्च वजा जाता समाधानकारक नफा मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर गवारीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या बाजारात गवारीची आवक वाढलेली असून, गुणवत्तेवरही उष्णतेचा परिणाम दिसत आहे. त्यामुळे दरावर दबाव आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर आवक कमी झाल्यास गवारीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
ठकसेन हिंगे पाटील, गवार व्यापारी, मंचर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT