मंचर: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी आणि वाहतूक व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे. शेतीची बहुतांश कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून केली जात असल्याने डिझेल दरवाढीचा थेट परिणाम शेती खर्चावर होत आहे.
नांगरणी, पेरणी, फवारणी आणि मळणी यांसारख्या शेतीकामांसाठी ट्रॅक्टर अत्यावश्यक असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना इंधन दरवाढीमुळे शेती अधिक खर्चिक बनत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
दुसरीकडे मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या टेम्पो, ट्रक आणि इतर वाहनांच्या इंधन खर्चात वाढ झाल्याने वाहतूक दरही वाढू लागले आहेत. भाजीपाला, धान्य, बांधकाम साहित्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाहतुकीचा खर्च वाढल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वाहतूक व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने जुन्या दरात मालवाहतूक करणे परवडत नाही. त्यामुळे वाहतूक दर वाढविण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. इंधन दरवाढीमुळे शेती उत्पादन खर्चाबरोबरच बाजारातील महागाईही वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
ट्रॅक्टरशिवाय शेतीची कामे करणे शक्य नाही. डिझेल दर वाढल्यामुळे नांगरणीपासून पेरणीपर्यंत प्रत्येक कामाचा खर्च वाढला आहे. आधीच शेती परवडत नसताना आता इंधन दरवाढीमुळे अडचणी आणखी वाढल्या आहेत, असे अमोंडीचे उपसरपंच धनंजय फलके यांनी सांगितले. मालवाहतुकीसाठी दररोज मोठ्या प्रमाणात डिझेल लागते. इंधनाचे दर सतत वाढत असल्याने जुन्या भाड्यात व्यवसाय करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे वाहतूक दर वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे, असे पोंदेवाडीचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी सांगितले.