Manajinagar Drainage Cleaning Pudhari
पुणे

Manajinagar Drainage Cleaning: नऱ्हे येथे तुंबलेली ड्रेनेजलाईन मोकळी; मानाजीनगर परिसरातील नागरिकांना दिलासा

टायगर मशिनच्या साहाय्याने केली साफसफाई

पुढारी वृत्तसेवा

धायरी: नऱ्हे येथील मानाजीनगर परिसरातील तुंबलेल्या ड्रेनेजलाईनमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबतचे वृत्त दै.'पुढारी'मध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाने तातडीने या ड्रेनेजलाईनची साफसफाई केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मानाजीनगर येथील ग्रीनलँड कौंटी सोसायटीसमोरील ड्रेनेजलाईन तुंबल्याने चेंबरमधून सांडपाणी मुख्य रस्ता व बाजारपेठेत वाहत होते. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली होती, तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने मलेरिया, डेंग्यू आणि अन्य साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.

परिसरात अनेक गृहनिर्माण संस्था असून, मोठी लोकवस्ती आहे. तसेच येथील ज्ञान मंदिर शाळेत दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक येत असल्याने त्यांनाही या समस्येचा सामना करावा लागत होता.

सांडपाण्यामुळे पादचारी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या प्रश्नावर तातडीने तोडगा न काढल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा माजी उपसरपंच सुशांत कुटे यांनी दिला होता.

या समस्येबाबत दै.'पुढारी'ने 'नऱ्हेमध्ये ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिक त्रस्त' या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त प्रज्ञा पोतदार यांनी तातडीने ड्रेनेजलाईनचे साफसफाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यार होत्या. त्यानुसार टायगर मशिनच्या साहाय्याने या ड्रेनेजलाईनची साफसफाई करण्यात आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT