Man kills person for harassing woman relative
पुणे: नात्यातील महिलेची छेड काढल्याच्या कारणातून तरुणाला लाथाबुक्क्या, हॉकी स्टीकने बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना चंदननगरमधील आंबेडकर वसाहतीत मंगळवारी (दि.12) रात्री साडेआठ दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. साईनाथ ऊर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय 35, रा. आंबेडकर वसाहत चंदननगर, मूळ बार्शी) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी अवघ्या काही तासात खुनाचा छडा लावत सोन्या ऊर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय 21,), समर्थ ऊर्फ करण पप्पू शर्मा (वय 21, दोघे रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) या दोघांना अटक केली. याबाबत पोलिस हवालदार राहुल गिरमे यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर भागातील डॉ. आंबेडकर वसाहतीत आरोपी वाल्हेकर, शर्मा राहण्यास आहेत. तर जानराव हा फिरस्ता असून, गेल्या काही महिन्यापासून आंबेडकर वसाहतीत राहतो. तो मूळचा बार्शी येथील आहे. जानराव याने आरोपींच्या नात्यातील एका महिलेची महिलेची छेड काढली होती. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. मंगळवारी (दि.12 ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी वाल्हेकर, शर्मा यांनी जानराव याच्याशी पुन्हा वाद घातला. नात्यातील महिलेची छेड का काढली? असा जाब विचारला.
आरोपींनी जानराव याला लाथाबुक्क्यांनी, तसेच हॉकीस्टीकने बेदम मारहाण केली. मारहाणीत जानराव गंभीर जखमी झाला. आरोपी तेथून पसार झाले होते. मारहाण झाल्यानंतर जानराव तेथून उठून जाताना सीसीटीव्हीत दिसून येत होता. माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, चंदननगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी धाव घेतली.
जानरावला मारहाण केल्यानंतर तो उठून एका ठिकाणी गेला होता. परंतु काही वेळानंतर त्याची हालचाल बंद झाली. वाल्हेकर यानेच पोलिसांना एक व्यक्ती बेशुद्ध पडल्याची माहिती कॉलद्वारे दिली. पोलिस तेथे पोहोचले. त्यांनी जानरावला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. त्या वेळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांना जानरावच्या मृत्यूबद्दल संशय आला.
वाल्हेकर याने माहिती देताना बेवारस व्यक्ती, असे सांगितले होते. शवविच्छेदन करणार्या डॉक्टरांकडे ढाकणे यांनी शंका व्यक्त केली. अहवाल प्राप्त होताच त्यांचा संशय खरा ठरला. डॉक्टरांनी सांगितले शरीरात अंतर्गत एकापेक्षा जास्त जखमा झाल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शिवाय त्याला झालेल्या जखमा या ताज्या आहेत.
खुनाचा प्रकार असल्याचे ढाकणे यांच्या लक्षात आले. त्यांनी आपला मोर्चा वसाहतीत वळविला. दोघांनी मारहाण केल्यामुळे जानरावचा खून झाल्याची चर्चा वसाहतीत होती. परंतु कोणी स्पष्ट बोलत नव्हते. ढाकणे यांनी तेथील काही लोकांना विश्वासात घेऊन विचारणा केली. त्या वेळी वाल्हेकर आणि शर्मा या दोघांनी त्याला मारहाण केल्याचे समजले.
ढाकणे यांच्या लक्षात आले. आपल्याला बेवारस व्यक्ती पडल्याची माहिती देणारा तर वाल्हेकर आहे. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच खुनाची कबुली दिली. जानराव हा वसाहतीत फिरस्ता म्हणून राहत होता. त्याला दारूचे व्यसन आहे. तो मूळचा बार्शीतील असून, अनेक दिवसांपासून तो वसाहतीत राहत होता, असेदेखील ढाकणे यांनी सांगितले.
नात्यातील महिलेची छेड काढल्याच्या कारणातून दोघांनी एकाला मारहाण केली. मारहाण झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी, खुनाचा गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे, असेही चंदननगरच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी सांगितले.