दुर्घटनेनंतरही माळीविासीयांना घरांसाठी अडीच वर्षांची प्रतीक्षा Pudhari
पुणे

Malin Village: दुर्घटनेनंतरही माळीविासीयांना घरांसाठी अडीच वर्षांची प्रतीक्षा; गावकर्‍यांनी अडीच वर्षे काढली पत्राशेडमध्ये

151 लोकांच्या स्मरणार्थ उभारला स्मृतिस्तंभ

पुढारी वृत्तसेवा

Malin survivors still waiting for homes

अशोक शेंगाळे

भीमाशंकर: माळीण दुर्घटना सर्वप्रथम एसटी बसचालकाच्या लक्षात आली. त्यानंतर संपूर्ण गावच एका रात्रीत गायब झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर शासकीय सर्व यंत्रणा कामाला लागल्या. मृतांच्या वारसांना मदत जाहीर करण्यात आली.

गावच्या पुनवर्सनासाठी तातडीने पावले उचलली गेली. प्रत्यक्षात मात्र माळीणच्या नागरिकांना घरे मिळण्यासाठी तब्बल अडीच वर्षे वाट पाहावी लागली. तोपर्यंत त्यांना ऊन, वारा, पावसात पत्राशेडमध्येच दिवस काढावे लागले. (Latest Pune News)

दुर्घटनेनंतर शासनाच्या वतीने मृतांच्या वारसांना प्रत्येक व्यक्तीमागे 8.50 लाख रुपयांची मदत देण्यात आली तसेच विविध योजनांमधून मदत करण्यात आली. दुर्घटना घडल्यानंतर दोन महिन्यांत माळीण फाट्यावर शेड उभारून येथे नागरिकांना तात्पुरता आधार दिला, तसेच कायमस्वरूपी पुनर्वसन एका वर्षात करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यामुळे दुर्घटनेनंतर माळीणकरांचे दु:ख लवकरच शमले जाईल, असे वाटत होते; मात्र येथील नागरिकांना अडीच वर्षे पत्राशेडमध्ये राहावे लागले. त्यांना अडीच वर्षांनंतर घरे मिळाली.

दि. 1 एप्रिल 2017 रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, दिवगंत गिरीश बापट, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, विजय शिवतारे, दिलीप वळसे पाटील या तत्कालीन मंत्र्यांच्या हस्ते घरांचे लोकार्पण करण्यात आले.

या नवीन गावात 68 घरे बांधण्यात आली असून, सर्व नागरी मूलभूत सेवासुविधा देण्यात आल्या आहेत. माळीण दुर्घटनेतून वाचलेल्या 16 अंशत: बाधित कुटुंबांचे प्रचंड हाल झाले. नंतर यांनाही नवीन गावठाणात घर मिळाले. मात्र, अजूनही काही कुटुंबांना घरे मिळाली नाहीत.

दरम्यान, पुनर्वसनानंतर दि. 24 जून 2017 रोजी झालेल्या पहिल्याच पावसात या नवीन गावची दैना उडाली. पुनर्वसनासाठी निवडलेल्या जमिनीचा भाग डोंगर उताराचा असल्याने या जमिनीवर घरे बांधण्यासाठी सपाटीकरण करण्यात आले. मोठ्या भरावांच्या ठिकाणी गॅबियन वॉल बांधण्यात आले. दगडी पिचिंग केले, प्रिकास्ट गटर, आरसीसी पाइप टाकले. यामध्ये पक्के रस्ते बांधून घेतले. यानंतर आता झालेल्या पावसात कुठेही जमीन खचली नाही अथवा पाणी तुंबले नाही.

या झाडांत आमची माणसे दिसतात

जुन्या माळीणच्या ठिकाणी मृतांच्या आठवणीत स्मृतिस्तंभ बांधले आहे. त्या ठिकाणी 151 लोकांच्या नावाने वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. ही झाडे आता दहा वर्षांत मोठी होऊन स्मृतिवनाजवळील परिसर नयनरम्य दिसत आहेत. या वृक्षांकडे पाहिल्यावर त्यात आम्हाला आमची जिवंत माणसे दिसत असल्याचे माळीणवासीय सांगत आहेत. येथे पहिली ते सातवीत 57 मुले जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहेत, तर कृष्णा यशवंत भालचिम माध्यमिक विद्यालय माळीण फाटा येथे 36 मुले दहावीपर्यंत शिक्षण घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT