

दौंड: दौंड शहर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष स्वप्निल शहा हे अध्यक्षपदावरून पाय उतार झाल्यावर ते सध्या शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे समजते. यावरून दौंड शहरात भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचे दिसून येत आहे.
दौंड तालुक्याचा बडा नेता हा आपल्या मर्जीतीलच कार्यकर्त्यांची विविध पदावर वर्णी लावत असल्याचे पहावयास मिळते,परंतु याचा फटका दौंड शहरात भाजपला बसल्याशिवाय राहणार नाही असे आजचे तरी चित्र आहे. (Latest Pune News)
माजी शहराध्यक्ष स्वप्निल शहा हे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संपर्कात असून त्यांनी नुकतीच दिल्लीमध्ये त्यांची भेट घेतली. स्वप्निल शहा यांनी प्रामाणिकपणे अनेक वर्षांपासून भाजपचे काम केले. सध्या त्यांच्यानंतर आलेल्या कार्यकर्त्यांना विविध पदे नुकतीच बहाल करण्यात आली , जे पदाधिकारी आता दौंड शहरात आहेत ते यापूर्वी कधीही सक्रिय नव्हते केवळ राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने त्यांना पदे मिळाली आहेत असे दौंड शहरात बोलले जाते आहे.
सध्या दौंड शहर भाजपच्याबाबतीत बोलायचे झाले तर आयाराम गयाराम लाच महत्त्व जास्त आहे. ज्यांनी खस्ता खाऊन पडत्या काळात पक्ष सांभाळला त्यांची मात्र बोळवण झाली असल्याचे चित्र दौंड शहरात आहे.
आगामी काळात पक्षाचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात हे पाहणे गरजेचे आहे. नाही तर येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपला दौंड शहरात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य पातळीवर किंवा केंद्रीय पातळीवर वरिष्ठ नेत्यांनी या गोष्टीचा सखोल विचार करणे गरजेचे आहे असे मत काही जाणकारांचे आहे, परंतु आगामी काळात भाजपला पुन्हा मागील दिवस येण्याची शक्यता नाकारता येत नाही
दौंड तालुका हा एकेकाळी शरद पवारांचा बालेकिल्ला होता 2014 पासून या तालुक्याला घरघर लागली व बारामतीकरांची पकड या तालुक्यावरून निसटली आता सध्या तरी हा तालुका भाजपच्या मागे असल्याचे पहावयास मिळते, परंतु वरिष्ठ नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे पुन्हा मागचे दिवस येतात की काय? असे चित्र वाटू लागले आहे.
सध्या माझ्या संपर्कात अनेक पक्षांचे वरिष्ठ नेते आहेत, मी अद्यापही कोणता निर्णय घेतलेला नाही. योग्य वेळ आली की मी निर्णय नक्कीच घेईल. पक्षाशी प्रामाणिक राहून निष्ठेने काम केले त्याचे असे फळ मिळेल हे मला कधीच वाटले नव्हते. पक्षप्रवेशाचे अद्यापही निश्चित झालेले नाही.
-स्वप्निल शहा, माजी शहराध्यक्ष, दौंड, भाजपा