दोघा आरोपींना केली अटक
महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याने केला खून
बारामती : खांडज (ता. बारामती) येथील राऊतवस्ती येथे मारुती साहेबराव रोमण (वय ५८) यांचा खून करत त्यांचा मृतदेह एका विहिरीत टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या खून प्रकरणाचा माळेगाव बुद्रूक पोलिसांनी छडा लावला. या प्रकरणी नवनाथ शिवाजी घोगरे (वय २५, मूळ रा. कार्लेभाजे, लोणावळा, ता. मावळ) व अनिल गोविंद जाधव (वय ३५, रा. आंबेवाडी, ता. रोहा, जि. रायगड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी माळेगाव बुद्रूक पोलिस ठाण्यात विजय मारुती रोमण यांनी फिर्याद दिली आहे. दि. ५ ते ७ मे या दरम्यान ही घटना घडली. मारुती रोमण यांच्यावर कोणत्या तरी टणक वस्तूने प्रहार करत त्यांचा खून करण्यात आला. मृतदेहाच्या गळ्यामध्ये काळ्या रंगाची साडी बांधत त्यात दगडे बांधून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह कांतीलाल सयाजी माने यांच्या विहिरीत टाकला गेल्याचे उघड झाले होते. हा मृत्यू संशयास्पद असल्याने पोलिसांनी लागलीच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनासाठी हा मृतदेह बारामतीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेला.
शवविच्छेदन अहवालानुसार टणक वस्तूने प्रहार केल्याने हा खून झाल्याचे समोर आले. त्यानुसार माळेगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी गुन्हे शोध पथक व पोलिस अंमलदारांची दोन पथके तयार करत तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान मारुती रोमण यांचे कुटुंबात किंवा बाहेर कोणाशी वाद झाले होते का, मयत व्यक्तिला अखेरचे कोणी पाहिले अशी माहिती काढण्यात आली. त्यात मजूर कामासाठी आलेल्या दोघांसोबत मारुती रोमण यांना अखेरचे बघितल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मृतदेह टाकलेल्या विहिरीपासून काही अंतरावर खोपी बांधून राहणाऱ्या घोगरे व जाधव यांच्याकडे पोलिसांची संशयाची सुई वळाली. या दोघांकडेही पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली. परंतु या दोघांनीही आम्ही रोमण यांना ओळखत नसल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. इतर मजूर महिलांकडे महिला पोलिसांनी चौकशी केली असता पुरुष व महिला मजूर यांच्या माहितीमध्ये विसंगती दिसून आली. त्यामुळे हे दोघे काही तरी लपवत असल्याचा दाट संशय पोलिसांना आला. त्यामुळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत सखोल चौकशी सुरु केली.
या चौकशीत मयत मारुती रोमण यांनी घोगरे याच्या नातलग महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली होती. ही बाब महिलेने या दोघांना सांगितली होती. त्यातून घोगरे याने जाधव याच्या साथीने रोमण यांना बोलावून घेत त्यांच्याशी गोड बोलून निर्जनस्थळी नेले. तेथे डोक्यात दगड घालून खून केला. मयताची ओळख पटू नये यासाठी त्यांची कपडे काढून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ती जाळण्यात आली. मृतदेह काही काळ ऊसाच्या शेतात लपवून नंतर रात्रीच्या सुमारास अंधारात विहिरीत टाकण्यात आला. विहिरीतून तो लवकर वर येवू नये यासाठी मृतदेहाचे हातपाय साडीने बांधून त्यात मोठमोठी दगडे टाकण्यात आल्याची या दोघांनी कबुली दिली.
ही कामगिरी पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन लोखंडे, उपनिरीक्षक देवीदास साळवे, अमोल खटावकर, तुषार भोर, सहा. उपनिरीक्षक संजय मोहिते, हवालदार सादीक सय्यद, राहूल पांढरे, विजय वाघमोडे, रुपाली धीवार, ज्ञानेश्वर सानप, ज्ञानेश्वर मोरे, अमोल राऊत, अमोल वाघमारे, अमोल कोकरे, विकास बंडगर, सागर पवार, सुनिता पाटील आदींनी केली.