पुणे: अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यभरात पुढील तीन ते चार दिवस वादळी वार्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने यंत्रणेसाठी हाय अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीसह पावसाळ्यातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आपत्कालीन नियोजन करण्यात आले आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी राज्यातील वीजपुरवठ्याचा आढावा घेतला. नैसर्गिक आपत्तीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, मुख्यालय व परिमंडल स्तरावर 24 बाय 7 आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची लगेचच स्थापना करावी. (Latest Pune News)
कोणीही मुख्यालय सोडू नये असे निर्देश लोकेश चंद्र यांनी दिले. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या या बैठकीमध्ये संचालक (संचालन) सचिन तालेवार यांच्यासह राज्यातील मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते उपस्थित होते. यंदा मान्सूनच्या आगमनापूर्वीच राज्यात वादळी वार्यासह मुसळधार पावसाची दररोज हजेरी सुरू आहे.
अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र सध्या स्थिर असले, तरी त्याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळीवार्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये सुरळीत वीजपुरवठ्याच्या उपाययोजनांसाठी ही बैठक झाली. दरम्यान, शुक्रवार (दि. 23) पासून मुख्यालय व राज्यातील आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षांचे कामकाज सुरू झाले आहे.