राहू: महावितरणचे काही अधिकारी देखभाल-दुरुस्ती यंत्रणेच्या नावाखाली समांतर आर्थिक उत्पन्नाचे मार्ग काढत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. हे अधिकारी देखभाल दुरुस्तीसाठी यंत्रणेचा वापर करून ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे उकळतात. परिणामी एकीकडे ग्राहकांची लूट तर दुसरीकडे महावितरणलाही मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
केडगाव कार्यकारी अभियंता कार्यालयांतर्गत काही दुय्यम अभियंते व उपविभागीय अधिकारी असे प्रकार करत असल्याचा आरोप होत आहे. त्यांनी देखभाल दुरुस्तीसाठी स्वत:चीच खासगी यंत्रणा उभी केली आहे. गावोगावी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अधिकृत पथक न पाठवत या खासगी यंत्रणेला पाठवत असल्याचे उघड झाले आहे. या सेवेसाठी ग्राहकांकडून 500 ते 1500 रुपये आकारले जात असल्याचेही आरोप आहेत. (Latest Pune News)
हे अधिकारी महावितरणच्या अधिकृत ठेकेदारांना काम न देता आपल्याच यंत्रणेच्या माध्यमातून ग्राहकांकडून पैसे घेऊन दुरुस्ती करीत आहेत. या प्रकाराला ग्राहक संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला आहे.
सरकारकडून पगार, भत्ते घेणारे अधिकारीच अशा पद्धतीनेच सामान्य शेतकरी व घरगुती ग्राहकांची लूट करीत असतील, तर लोकांनी न्याय कुठे शोधायचा? त्यामुळे संबंधित अधिकार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. तसेच ग्राहकांना तातडीने सेवा मिळण्यासाठी अधिकृत दुरुस्ती पथक उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे दीपक पवार यांनी केली आहे.
अशा तक्रारीच आल्या नाहीत
याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता विकास आल्हाट म्हणाले, अशा प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाहीत. जर कुठे असे घडत असेल, तर त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.