Shirur News: राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती राहिली नाही. एका साखर कारखान्याच्या चेअरमनला पळवून नेले जाते. ठार मारण्याचा प्रयत्न केला जातो व 10 कोटी रुपये मागितले जातात. महाराष्ट्राचे गृहखाते निष्क्रिय व झोपले आहे का असा सवाल करीत आपल्या पवार कुटुंबीयास बदनाम करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार, आमदार अॅड. अशोक पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
शनिवारी (दि.9) शिरूर तालुक्यात आमदार अशोक पवार यांचे चिरंजीव व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार यांचे अपहरण करत त्यांना एका खोलीत डांबून जिवे मारण्याचा प्रयत्नाबरोबरच एका महिलेबरोबर व्हिडीओ शूटिंग करून 10 कोटी रुपये मागण्याचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर अशोक पवार यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला.
निवडणुकीचा स्तर घसरत चालला आहे. शनिवारी घडलेल्या प्रकरणातील मूळ सूत्रधार शोधला गेला पाहिजे. या प्रकरणातील ‘सीडीआर’च्या तपासानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. यासंबंधी तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून एक महिला फरार झाली आहे. विरोधकांना पराभव दिसत असल्याने आपल्या कुटुंबीयाच्या बदनामीचे प्रयत्न करण्याचा हा भाग आहे.
या प्रकरणात ‘मलिदा गँग’ अथवा ‘एमआयडीसी’तील कोणी गँग आहे का याचाही तपास व्हावा, हे एक राजकीय षडयंत्र असल्याची भीती आ. अशोक पवार यांनी व्यक्त करत निवडणूक जिंकण्यासाठी कुठलाही थर राजकारणात गाठला जात असून पोलिसांनी लवकरात लवकर यामागचे सत्य बाहेर आणावे, असे आवाहन आ. अशोक पवार यांनी या वेळी केले. पत्रकार परिषदेस घोडगंगा कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख पोपटराव शेलार आदी उपस्थित होते.
पोलिसांनीच दिला होता इशारा
या पूर्वीच आपल्या कुटुंबातील सदस्याला ‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकविले जाऊ शकते असा इशारा पोलिसांनीच काही दिवसापूर्वी आपल्याला दिला होता, असेही आमदार पवार यांनी सांगितले.