Mahatma Phule's 9 Rare Biographies Book Pudhari
पुणे

Mahatma Phule: महात्मा फुले यांच्या नऊ जुन्या अल्पचरित्रांचा संग्रह प्रकाशित होणार; पुणे विद्यापीठात प्रकाशन सोहळा

Mahatma Phule's 9 Rare Biographies Book: महात्मा जोतीराव फुले यांच्या नऊ जुन्या अल्पचरित्रांचे पुस्तक पुण्यात प्रकाशित होणार आहे. हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाने संपादित केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. “महात्मा जोतीराव फुले : नऊ जुनी अल्पचरित्रे (१८९१-१९३९)” या महत्त्वाच्या ग्रंथाचे प्रकाशन शनिवार, ११ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजता विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील संत ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे.

या ग्रंथाचे संपादन इतिहासाच्या प्राध्यापिका आणि विभागप्रमुख श्रद्धा कुंभोजकर यांनी केले असून, त्यांना इतिहास विषयाचे संशोधक विद्यार्थी बापूराव घुंगरगांवकर यांची साथ लाभली आहे. या दोघांनीही महात्मा फुले यांच्या विचारांचा आणि कार्याचा अभ्यास करून त्यांच्या विषयी लिहिलेली जुनी अल्पचरित्रे एकत्रित करण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.

या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी असणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व आणि संग्रहालय विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्ग उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम शैक्षणिक आणि वैचारिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे.

महात्मा जोतीराव फुले यांच्या निधनानंतरच्या पहिल्या पन्नास वर्षांत, म्हणजे १८९१ ते १९३९ या कालावधीत विविध लेखकांनी त्यांच्या जीवनावर आधारित नऊ अल्पचरित्रे लिहिली होती. या चरित्रांमध्ये फुले यांच्या कार्याचा, त्यांच्या सामाजिक योगदानाचा आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा तपशीलवार आढावा घेतला आहे. विशेष म्हणजे ही चरित्रे विविध जात, वर्ग आणि प्रदेशातील लेखकांनी लिहिलेली असल्याने त्यांना ऐतिहासिकदृष्ट्या अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

या नव्या ग्रंथामध्ये आठ मराठी आणि एक इंग्रजी अशा नऊ अल्पचरित्रांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व चरित्रांचे एकत्रित पुनर्प्रकाशन प्रथमच करण्यात येत असून, संशोधक आणि वाचकांसाठी हा एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरणार आहे.

महात्मा फुले यांच्या जन्मदिनाच्या द्विशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा ग्रंथ प्रकाशित होत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. फुले यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT