

Mahatma Jyotiba Phule Jayanti 2025 | महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती. जोतिबा हे भारतातील सामाजिक लोकशाहीचे प्रवर्तक होते. सामाजिक सुधारणांना जोतिरावांनी नवी दिशा दिली. पाश्चात्त्य लोकशाही मूल्ये त्यांनी स्वीकारली आणि वाढवली. त्यांनी उदारमतवादाची जोपासना केली. समग्र परिवर्तनाचा आधार शिक्षण हाच आहे, शिक्षणाने माणूस बदलतो, शिक्षणाचा अधिकार हा सर्वांचा मानवी अधिकार आहे हे जोतिरावांनी ओळखले होते. त्यांंनी घालून दिलेल्या मार्गाने आधुनिक भारताची वाटचाल झाली, तर भारत अधिक उत्तमरीत्या प्रगतिपथावर वाटचाल करेल.
भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात महात्मा जोतिराव फुले यांचे स्थान अद्वितीय आहे. त्यांनी सामाजिक सुधारणांचे नवे पर्व सुरू केले. पश्चिम भारतातील सामाजिक जागृतीमध्ये त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. संविधानासाठी आवश्यक अशा लोकशाही मूल्यांच्या स्थापनेसाठी जोतिरावांनी अविरत संघर्ष आणि समर्पणही केले. महात्मा जोतिबा फुले हे भारतीय संविधानाच्या सरनाम्यात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय समाविष्ट करणार्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे गुरू होते. कारण, सामाजिक सुधारणांना जोतिबांंनी नवी दिशा दिली. पाश्चात्त्य लोकशाही मूल्ये त्यांनी स्वीकारली आणि वाढवली. त्यांनी उदारमतवादाची जोपासना केली. थॉमस पेन यांचा ‘ह्यूमन राईटस् द एज ऑफ रिझन’ हा ग्रंथ वाचून त्यांना मानवी मूल्यांची जाणीव झाली आणि ते अस्वस्थ झाले. भारतात अशी लोकशाही प्रस्थापित करण्याचा आग्रह त्यांनी धरला.
विद्या, मती, गती आणि अर्थ यांचा परस्पर संबंध जोतिरावांनी विषद करून सांगितला होता. ‘शेेतकर्यांचा आसूड’ या त्यांच्या ग्रंथाच्या उपदेशात त्यांनी सांगितले होते की, ‘विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.’ त्यामुळे शिक्षण नसल्यामुळे हा सगळा अनर्थ होतो, हे त्यांनी ओळखले. समग्र परिवर्तनाचा आधार शिक्षण हाच आहे, शिक्षणाने माणूस बदलतो, शिक्षणाचा अधिकार हा सर्वांचा मानवी अधिकार आहे, हे जोतिरावांनी ओळखले होते. त्यामुळेच इंग्लंडचा राजपुत्र भारतात आला असताना सर्वांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण द्या असा आग्रह जोतिरावांनी त्या काळात धरला होता. भारतात आज सर्वांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्याचे प्रवर्तक म्हणून जोतिबांचा विशेष उल्लेख करावा लागेल.
जोतिबांनी महाराष्ट्रात अभूतपूर्व शैक्षणिक क्रांती घडवून आणली. त्यांनी शिक्षणाची गंगा गरीब माणसांच्या दारापर्यंत पोहोचवली. 1848 पर्यंत महाराष्ट्रात क्षुद्र आणि स्त्रिया यांना शिक्षणाचा अधिकार नव्हताच. त्यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतात रात्रशाळा स्थापन करण्याचे श्रेयसुद्धा जोतिबांकडे जाते. प्रौढ शिक्षणाचेसुद्धा ते प्रवर्तक आहेत. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी मिळून केलेले कार्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केलाच शिवाय शिक्षणाची गंगाही खुली केली. या क्रांतिकारी कार्यामुळेच काही वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले. जोतिरावांच्या या शैक्षणिक कार्याचा खराखुरा आधार त्यांच्या समताधिष्ठित विचारात दिसतो. भारतीय लोकशाही आज एका वळणावर उभी आहे आणि तिला लोकांच्या जीवनाचा मार्ग कसा बनवायचा, हा प्रश्न आहे. त्या द़ृष्टीने भारतीय लोकशाहीत जी मूल्ये सांगितली आहेत, त्या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, दयानंद सरस्वती या सर्वांनी केलेल्या कार्याची विशेष नोंद घेऊन आपण आपल्या समाजरचनेत आणि एकूणच राष्ट्रीय संस्कृतीत वेगवेगळे बदल करून तिला प्रगतिपथावर नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महात्मा फुले यांंनी घालून दिलेल्या मार्गाने आधुनिक भारताची वाटचाल झाली, तर भारत अधिक उत्तम प्रगतिपथावर वाटचाल करेल. शोषणमुक्त कृषीप्रधान समाज उभे करणे आणि भारताला सर्वांगीण प्रगतीचा मार्ग दाखवणे, हाच जोतिरावांच्या विचारांचा खरा उपयोग होय.