पुणे: जलसंपदा विभागाचे जुलै 2025 ते 2028 या कालावधीसाठीचे पाणी वापराचे दर जलसंपदा विभागाकडून अजून अंतिम झाले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मागील वर्षीचे जलदर डिसेंबर 2025 पर्यंत कायम ठेवले आहेत. त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. जलदर ‘जैसे थे’ असले तरी 2026 पासून मात्र जलदरात वाढ प्रस्तावित होण्याची शक्यता आहे.
जलसंपदा विभागाने तीन वर्षांचा जलदर वाढीबाबतचा प्रस्ताव तयार करून प्राधिकरणाकडे सादर केला नाही. 2025- 2028 या कालावधीसाठी जलदर निश्चितीचे काम सुरू केले आहे. जलसंपदा’कडून या कालावधीसाठी 10 ते 15 टक्के वाढ प्रस्तावित करण्याची शक्यता आहे. (Latest Pune News)
पहिल्या टप्प्यातील जाणकार व्यक्तींसोबत सल्लामसलत प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच, जलदर निश्चिती करण्याचा मसुदा सुधारित करून तो शासनास सादर केला आहे. मात्र, अंतिम प्रस्ताव प्राधिकरणास प्राप्त झालेला नाही. यावर प्राधिकरणाने 11 प्रपत्रांमध्ये निकषासाठी आधारभूत माहितीसह दरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश जलसंपदा विभागास दिले आहेत.
पाणीपट्टीत वाढ होणार
ठोक पाण्याचे दरानुसार महापालिका, कारखाने आणि शेतीसाठी पाण्याचा वापर करणारे शेतकरी यांना पैसे भरावे लागतात. पाण्याच्या दरात प्राधिकरणाकडून वाढ केल्यास त्या दरानुसार घाऊक पाणी वापरणार्या संस्थांच्या पाणीपट्टीत वाढ होणार असते.