गणेश खळदकर
पुणे: दहावीमध्ये दरवर्षी लाखांवर विद्यार्थ्यांना चित्रकलेसाठी अतिरिक्त गुण दिले जातात; परंतु यातील दहा हजार विद्यार्थी देखील कला संचालनालयाच्या अखत्यारीत असलेल्या कलाविषयक अभ्यासक्रमांना प्रवेश घेत नाहीत. त्यामुळे संबंधित गुणांचा वापर हा केवळ अकरावी, आयटीआय तसेच तंत्रशिक्षण डिप्लोमा प्रवेशासाठीच केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा स्पर्धांमधील प्रावीण्यासाठी गुण देण्यास सुरुवात केल्यानंतर दरवर्षी एक लाखाहून अधिक विद्यार्थी चित्रकला या प्रकारात अतिरिक्त गुण मिळवत आहेत. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणवाढीसाठी चित्रकला एकप्रकारे वरदानच ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी तब्बल 1 लाख 75 हजार 558 विद्यार्थ्यांना, तर यंदा 1 लाख 91 हजार 31 विद्यार्थ्यांना चित्रकलेसाठी वाढीव गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे क्रीडा-कलागुणांमुळे दहावीच्या गुणपत्रिकेला चांगलाच फुगवटा येत असला, तरी संबंधित गुणांचा वापर विद्यार्थी त्या क्षेत्रात अभ्यासक्रम निवडीसाठी न करता केवळ प्रवेशासाठी करीत असल्याचे उघडकीस आले आहे.
कला संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कला संचालनालयाच्या अखत्यारीत असलेल्या अभ्यासक्रमांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम संधी आहेत. परंतु, या संधीविषयी माहिती नसल्यामुळे विद्यार्थी या अभ्यासक्रमांकडे दुर्लक्ष करतात. परंतु, कल्पकता आणि कुशाग््रा बुद्धिमत्ता असलेल्या तसेच कलेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला, तर त्यांना कलाक्षेत्रात नाव कमविण्याची एक चांगली संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, कला संचालनालयाच्या अखत्यारीत अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया देखील सुरू झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
एक आणि तीन वर्षांचे अभ्यासक्रम...
कला संचालनालयाच्या अखत्यारीत दहावीनंतर एक आणि तीन वर्षांचे अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये फाउंडेशन सर्टिफिकेट इन आर्ट अँड डिझाइन, रेखा व रंगकला, उपयोजित कला, शिल्पकला व प्रतिमानबंध, अंतर्गत गृहसजावट, वस्त्रकाम (टेक्सटाईल, प्रिंटिंग अँड ड्राइंग), वस्त्रकाम (टेक्सटाईल, व्हिविंग), मातीकाम (सिरॅमिक) आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. संबंधित अभ्यासक्रमांच्या साधारण दहा हजारांवर जागा राज्यात उपलब्ध आहेत. परंतु, या अभ्यासक्रमांच्या जागा रिक्तच राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अतिरिक्त कलागुणांवर चाप लावण्याची मागणी...
दहावीमध्ये विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा स्पर्धांमधील प्रावीण्यासाठी गुण देण्यात येतात. यामुळे विद्यार्थ्यांची गुणपत्रिका फुगून केवळ स्पर्धा तयार होते. प्रत्यक्षात ज्यासाठी हे गुण दिले जातात, त्या क्षेत्रांमध्ये मात्र विद्यार्थी पुढील प्रवेश घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केवळ प्रवेशापुरताच वापर होणाऱ्या या अतिरिक्त कलागुणांना चाप लावण्याची गरज शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.