Sugarcane Crushing Season Pudhari
पुणे

Maharashtra Sugarcane Crushing Season: राज्यात ऊस गाळप हंगामाला वेग; १६१ कारखान्यांकडून २०९ लाख टन गाळप

आतापर्यंत १७९.८९ लाख क्विंटल साखर उत्पादन; गाळपात पुणे विभाग आघाडीवर, तर साखर उताऱ्यात कोल्हापूर प्रथम

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यात यंदाच्या सुरू असलेल्या २०२६- २७ च्या गाळप हंगामात आता साखर कारखाने सुरू होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. सद्यःस्थितीत १६१ कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आणखी २३ कारखाने सुरू झालेले आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत २०९ लाख टनाइतके ऊस गाळप पूर्ण झालेले आहे. तर निव्वळ ८.६२ टक्‍के उताऱ्यानुसार १८ लाख मेट्रिक टनाइतके साखरेचे उत्पादन हाती आले आहे. त्यामुळे ऊस गाळप हंगामाने खऱ्या अर्थाने वेग घेतल्याची माहिती साखर आयुक्तालयातून मिळाली.

राज्यात सध्या ८१ सहकारी आणि ८० खासगी मिळून १६१ कारखान्यांची धुराडी सुरू झालेली आहेत. विभागनिहाय ऊस गाळप स्थिती पाहता पुणे विभागातील २८ कारखान्यांनी सर्वाधिक ५५.७८ लाख टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. तर सरासरी ९.३९ टक्‍के उताऱ्यानुसार ५२.३९ लाख क्विंटलइतके सर्वाधिक साखर उत्पादन तयार करीत घेतलेली हंगामातील आघाडी कायम आहे. ऊस गाळपात सोलापूर विभागही दुसऱ्या स्थानी कायम आहे. या विभागातील ३४ कारखान्यांनी मिळून ३९.३४ लाख टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. तर ८.०१ टक्‍के उताऱ्यानुसार ३१.५ लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे.

शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे कोल्हापूर विभागातील १७ कारखाने सुरू होते. आता ही संख्या वाढून २८ वर पोहोचली आहे. कोल्हापूर विभागात २९.१८ लाख टन ऊस गाळप पूर्ण केलेले आहे. तर राज्यात सर्वाधिक ९.५८ टक्‍के निव्वळ साखर उतारा असून २७.९४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आले आहे. कोल्हापूर विभागाचा निव्वळ साखर उताऱ्यातील प्रथम क्रमांक कायम आहे. अहिल्यानगर विभागातील २२ कारखान्यांनी मिळून ३१.१६ लाख टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. तर ८.४७ टक्‍के निव्वळ उताऱ्यानुसार साखरेचे २६.३९ लाख क्विंटलइतके साखरेचे उत्पादन तयार केले आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात १७ कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू असून २२.३३ लाख टन गाळप पूर्ण झाले आहे. तर ७.८१ टक्‍के निव्वळ उताऱ्यानुसार साखरेचे १७.४३ लाख क्विंटल साखर उत्पादन हाती आले आहे. नांदेड विभागात २९ कारखाने सुरु असून त्यांनी २८.३४ लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. तर ७.८५ टक्‍के उताऱ्यानुसार २२.२६ लाख क्विंटल साखर उत्पादन तयार झाले आहे. अमरावती विभागातील तीन कारखान्यांकडून २.५२ लाख टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. तर ७.८६ टक्‍के उताऱ्यानुसार १.९८ लाख क्विंटलइतके साखर उत्पादन हाती आले आहे. त्यामुळे आठ विभागात मिळून साखरेचे १७९ लाख ८९ हजार क्विंटलइतके साखरेचे उत्पादन तयार झालेले आहे.

काही कारखाने गाळप अहवालच देईनात

यंदाच्या हंगामात गाळप परवाना प्रस्तावाच्या माहितीमध्ये साखर आयुक्तालयाने सर्व कारखान्यांनी रोजचे रोज ऊस गाळप अहवाल, साखर उत्पादनाची माहिती देणे अनिवार्य केले आहे. मात्र, काही कारखान्यांकडून अद्यापही दैनंदिन ऊस गाळप अहवाल साखर आयुक्तालयास कळवित नसल्याचे दिसून येत आहे. ही माहिती ऑनलाईन भरावयाची असल्याने कारखान्यांनी ती न चुकता देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या परिपत्रकीय सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या अशा कारखान्यांवर आता कोणती कारवाई होणार? हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT