Sugar Pudhari
पुणे

Maharashtra Sugar Production: राज्यात 10.45 कोटी टन ऊस गाळप; साखर उत्पादनात कोल्हापूरचा दबदबा कायम

पुणे-सोलापूर ऊस गाळपात आघाडीवर; 99 लाख टन साखर उत्पादन, 9.49 टक्के उतारा प्राप्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील सन 2025-26 चा ऊस गाळप हंगाम संपला असून, सरासरी 105 दिवस हंगाम चालला आहे. तर, 10 कोटी 45 लाख 58 हजार मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले असून, 99 लाख 18 हजार मेट्रिक टनांइतके साखर उत्पादन हाती आले आहे.

तर, 9.49 टक्क्यांइतका निव्वळ साखर उतारा मिळाला असल्याची माहिती साखर आयुक्ताल यातून मिळाली. ऊस गाळपात पुणे आणि सोलापूर विभाग अग््रास्थानी राहिला असून, साखर उत्पादन आणि उताऱ्यामध्ये कोल्हापूर विभागाने आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे ऊस गाळप हंगामाच्या अंतिम अहवालावरून दिसून येत आहे. राज्यातील 102 सहकारी आणि 107 खासगी मिळून एकूण 209 साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम घेतला.

या सर्व कारखान्यांची मिळून दैनिक ऊस गाळप क्षमता सुमारे 10 लाख 7 हजार 800 मेट्रिक टन राहिली. तुलनात्मक स्थिती विचारात घेता राज्यात गतवर्षीच्या हंगाम 2024-25 मध्ये 199 साखर कारखान्यांनी मिळून एकूण 853.82 लाख मे. टनांइतकेच ऊस गाळप पूर्ण केले होते. म्हणजेच गतवर्षापेक्षा यंदा सुमारे 191.76 लाख मे. टनांनी अधिक ऊस गाळप पूर्ण झाले असून, 182.51 लाख क्विंटलने साखर उत्पादनात वाढ झालेली असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून दिली.

पुणे विभागातील 32 कारखान्यांनी मिळून एकूण 222 लाख 55 हजार मे. टन, तर सोलापूरमधील 49 कारखान्यांनी एकूण 222 लाख 5 हजार मे. टनांइतके ऊस गाळप पूर्ण केले आहे. तिसऱ्या स्थानावर कोल्हापूर विभाग राहिला असून, तेथील 38 कारखान्यांनी मिळून एकूण 210 लाख 46 हजार मे. टन ऊस गाळप पूर्ण केले. मात्र, 231.91 लाख क्विंटल इतके सर्वाधिकसाखर उत्पादन व 11.02 टक्क्यांइतका सर्वाधिक साखर उतारा मिळवून कोल्हापूरने बाजी मारत वर्चस्व कायम ठेवले आहे. तुलनेने विभागनिहाय स्थिती पाहता साखर उताऱ्यात पुणे 9.88 टक्के व सोलापूर 8.61 टक्क्यांइतका साखर उतारा मिळाला आहे.

मंत्री समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार ऊस गाळप हंगामाचे केलेले नियोजन यशस्वी झाले. साखर आयुक्तालय आणि मिटकॉन संस्थेच्या हंगामपूर्व अंदाजानुसार 2025-26 हंगामात एकूण 105 लाख मे. टनाचा साखर उत्पादन अपेक्षित होते. तर, प्रत्यक्षात साखरेचे 99 लाख मे. टनांइतके उत्पादन मिळाले असून, अंदाजात मोठा फरक पडलेला नाही. यंदा सरासरी 105 दिवस हंगाम चालला आहे. उसाची वाढलेली दैनिक गाळप क्षमता आणि 150 दिवसांचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवून ऊस उत्पादकता वाढीवर सांघिक भर देण्याची आवश्यकता आहे.
डॉ. संजय कोलते, साखर आयुक्त, साखर आयुक्तालय, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT