पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापतिपद भारतीय जनता पक्षाने प्रथमच खेचून आणले. शिवाय, सभापतिपदी हिंगोलीचे भाजपचे संचालक अंकुश आहेर हे बिनविरोध निवडून आणण्यातही भाजपला यश आले.
संघाचे यापूर्वीचे सभापती प्रवीणकुमार तथा बाळासाहेब नाहाटा यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला होता. त्यामुळे रिक्त असलेल्या सभापतिपदासाठी मंगळवारी (दि.१३) अध्यासी अधिकारी तथा पुणे विभागीय उपनिबंधक मोहन निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मार्केट यार्डातील मुख्यालयात सकाळी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. सभापतिपदासाठी एकच अर्ज आल्यामुळे आहेर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
राज्यातील ३०५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची शिखर संस्था म्हणून राज्य बाजार समितीला महत्त्व आहे. गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ त्याठिकाणी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अलीकडे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम चालले होते. नाहाटा यांनाही सभापतिपद अजित पवार यांनीच दिले होते. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवर राष्ट्रवादीचे अधिक लक्ष केंद्रित केले.
संघावर राष्ट्रवादीचा सभापती करण्यासाठी पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याशिवाय सातारचे राष्ट्रवादीचेच शशिकांत शिंदे यांनीही लक्ष घातले होते. शिवाय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही फोनाफोनी केल्याचे समजते. मात्र, विदर्भातील काही राष्ट्रवादीच्याच संचालकांनी तोपर्यंत आहेर यांनाच सभापतिपद देण्यावर एकमत झाले आणि राष्ट्रवादी ऐन निवडणुकीत कमी पडल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. असे असले तरी महायुती म्हणूनही आहेर हे आमचेच सभापती असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विश्वास दाखविल्यामुळे संघाच्या सभापतिपदी माझी बिनविरोध निवड होऊ शकली आहे. तसेच संचालक मंडळावर कार्यरत सर्वपक्षीय संचालकांनी माझ्यावर विश्वास दाखविल्याने मला मिळालेल्या संधीचे सोनं मी बाजार समित्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीतून करेल. बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी नवीन योजना आणून आर्थिक उत्पन्न वाढीतून त्यांचा कायापालट करण्यास माझे शंभर टक्के प्राधान्य असेल. मी जवळबाजार (जि.हिंगोली) या समितीचे १२ वर्षे सभापतिपद भूषविले असून, विद्यमान संचालक आहे. त्या कामाच्या अनुभवाचा मला संघाच्या सभापतिपदी फायदा होईल.अंकुश आहेर, सभापती, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे