Sports Prize Pudhari
पुणे

Maharashtra Sports Cash Prize: ऑलिम्पिक सुवर्णविजेत्यांना आता ५ कोटींचे बक्षीस; महाराष्ट्र सरकारचा खेळाडूंसाठी मोठा निर्णय

रौप्यपदकासाठी ३ कोटी, कांस्यासाठी २ कोटी; आशियाई व राष्ट्रकुल सुवर्णविजेत्यांना १ कोटी

पुढारी वृत्तसेवा

सुनील जगताप

पुणे: राज्यातील क्रीडा संस्कृतीला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर देशाचे व राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवान खेळाडूंसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता खेळाडूंना कोटींच्या घरात बक्षिसे मिळणार आहेत.

क्रीडा धोरण २०१२ अंतर्गत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू तसेच त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना (कोचेस) दिल्या जाणाऱ्या रोख बक्षिसांच्या रक्कमेत भरघोस वाढ केली आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे राज्यातील खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन सुधारित धोरणानुसार ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूस आता थेट पाच कोटी रुपयांचे विक्रमी रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच, याच स्पर्धेत रौप्य पदक विजेत्याला तीन कोटी रुपये आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूला दोन कोटी रुपयांचे घसघशीत बक्षीस मिळणार आहे. याशिवाय आशियाई व राष्ट्रकुल खेळांमधील सुवर्णपदकासाठी एक कोटी रुपयांचे पारितोषिक निश्चित केले आहे.

खेळाडूंच्या यशात मोलाची भूमिका बजावणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांसाठी देखील या योजनेत विशेष तरतूद केली आहे. खेळाडूंना मिळालेल्या एकूण बक्षीसाच्या १० टक्के रक्कम मार्गदर्शकांना ‘३०:३०:४०’ या सूत्रानुसार पायाभूत, विकासात्मक आणि उच्च स्तर वाटप केली जाणार आहे. सांघिक खेळांसाठी अर्जुन पुरस्काराच्या धर्तीवर सुसंगत सूत्र तयार केले असून खेळाडूंना पारदर्शक पद्धतीने लाभ मिळावा, यासाठी ऑनलाईन पोर्टलची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.

शासनाच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील नवीन सुधारित धोरणानुसार खेळाडूंच्या पारितोषिकाची रक्‍कम वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता खेळाडूंमध्ये उत्‍साह वाढला असून प्रशिक्षकांनाही त्‍याचा फायदा होणार आहे. खेळाडूंसाठी क्रीडा विभागाकडून विविध योजनाही आणण्यात आलेल्या आहेत.
जगन्‍नाथ लकडे, जिल्‍हा क्रीडा अधिकारी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT